अभिजात भाषेचा दर्जा मराठीलाच मिळणार
By Admin | Updated: September 2, 2014 01:54 IST2014-09-02T01:35:33+5:302014-09-02T01:54:58+5:30
औरंगाबाद : ‘अभिजात’ या शब्दासंबंधी विद्वानांत गैरसमज आहेत. ‘अभिजात भाषा’ याचा अर्थ अभिजनांची भाषा असा नव्हे. प्राचीन, श्रेष्ठ, स्वयंभू आणि कालातीत,

अभिजात भाषेचा दर्जा मराठीलाच मिळणार
औरंगाबाद : ‘अभिजात’ या शब्दासंबंधी विद्वानांत गैरसमज आहेत. ‘अभिजात भाषा’ याचा अर्थ अभिजनांची भाषा असा नव्हे. प्राचीन, श्रेष्ठ, स्वयंभू आणि कालातीत, असा याचा अर्थ आम्हाला अभिप्रेत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागामध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमात प्रा. पठारे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, मराठी ही अभिजात भाषा आहे, या म्हणण्याची पुष्टी करण्यासाठी राजारामशास्त्री भागवत, श्रीधर व्यंकटेश केतकर, व्ही. व्ही. कोलते, राजवाडे, शंभू तुळपुळे, रा. भि. जोशी, के. एम. घाडगे या मराठीतील श्रेष्ठ विचारवंतांचे लेखन आणि त्यांची विधाने पुरावे म्हणून अहवालात सादर करण्यात आलेली आहेत. केंद्र सरकारकडे आता हा अहवाल गेलेला आहे. पाठपुरावा करण्यासाठी आता ‘लॉबिंग’ची गरज आहे. मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे यांनी ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमामागची भूमिका विशद केली. या कार्यक्रमात प्रा. पठारे यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ‘मायबोली’ या भित्तीपत्राचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास अंभुरे यांनी केले, तर सुरेश शिरसाट यांनी उपस्थितांचे आभार मानले.