मराठी समीक्षेची अनोखी ‘राग’ दारी हरवली

By Admin | Updated: May 27, 2016 23:28 IST2016-05-27T23:11:06+5:302016-05-27T23:28:10+5:30

औरंगाबाद : ज्येष्ठ समीक्षक आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

Marathi Samiti's unique 'Raga' has lost its charm | मराठी समीक्षेची अनोखी ‘राग’ दारी हरवली

मराठी समीक्षेची अनोखी ‘राग’ दारी हरवली

औरंगाबाद : ज्येष्ठ समीक्षक आणि अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रा. जाधव यांच्या निधनाची वार्ता साहित्य क्षेत्रासाठी धक्कादायक ठरली. औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २००४ साली झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
यानिमित्त मराठवाड्यातील साहित्यिक, समीक्षकांना त्यांचा सहवास मिळाला. प्रा.जाधव यांची उणीव मराठी समीक्षेला कायम जाणवत राहील, अशा शब्दांत साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दलित साहित्याचे थोर भाष्यकार
मराठी समीक्षेत रा. ग. जाधव यांनी मोठे योगदान दिले. समीक्षेची त्यांची स्वतंत्र शैली होती. त्यामुळे समीक्षेच्या काही नव्या संज्ञांची त्यांनी निर्मिती केली होती. मराठी साहित्यातील बहुतांशी सर्व वाङ्मय प्रकारांसंबंधी अभिजाततेने त्यांनी समीक्षा केली होती. विशेष उल्लेख करावयाचा तर दलित साहित्याचे ते थोर भाष्यकार होते. त्यांचा पहिला समीक्षा ग्रंथ ‘निळी पहाट’ हा त्याची साक्ष आहे. अस्मितादर्श या नियतकालिकाशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. देगलूर येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर औरंगाबादेतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. मराठी समीक्षा क्षेत्रातील अभ्यासक व संशोधकांना त्यांचे कार्य नेहमीच पथदर्शक राहील.
- डॉ. गंगाधर पानतावणे
आस्वादक समीक्षा
प्रा. रा. ग. जाधव हे कवी आणि समीक्षक असले, तरी समीक्षक म्हणूनच ते अधिक प्रसिद्ध होते. त्यांची समीक्षा आस्वादक आणि मार्गदर्शक होती. नव्या पिढीला त्यांच्या समीक्षेचा फार मोठा आधार होता. मराठी विश्वकोश मंडळाचे काही काळ ते अध्यक्ष होते. औरंगाबादेत झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्याशी माझे वैयक्तिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने मी खूप व्यथित झालो आहे.- रा. रं. बोराडे, साहित्यिक
मर्म जाणणारा समीक्षक
रा. ग. जाधव हे अतिशय मनमिळाऊ व लेखकांना समजावून घेणारे समीक्षक होते. लेखकाचे गुण नेमकेपणाने हेरणे आणि ते वाचकांसमोर मांडणे, हे कार्य त्यांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे केले. जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पदर होते. विश्वकोशाच्या संपादकपदाचे कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे केले. शासकीय विश्वकोशास दर्जा प्राप्त करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एक रसिक, वाङ्मयाचे मर्म जाणणारा समीक्षक आपल्यातून गेला. ही उणीव मराठी समीक्षेमध्ये कायमची जाणवत राहील. - सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक
कवितेइतकीच तरल समीक्षा...
रा. ग. जाधव यांचा मी प्रत्यक्ष विद्यार्थी राहिलो नाही, तरीदेखील माझ्यालेखी ते गुरुस्थानीच राहत आले. पिंडाने ते मूलत: कवीच होते म्हणूनच त्यांची समीक्षा ही कवितेइतकीच तरल आणि विचारांच्या दृष्टीने अतिशय सधन व सखोल राहिलेली आहे. साहित्यात येणारे नवे प्रवाह त्यांनी प्रमेयांसह वाचकांसमोर ठेवले. संगीताच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास रा. ग. जाधव यांची समीक्षा ही वेगळाच रियाज असलेली अनोखी अशी ‘राग’दारी होय. या रागदारीचा, मैफलीचा आनंद त्यांनी त्यांच्या लेखनातूनही दिला. - प्रा. फ. मुं. शिंदे, कविवर्य
रा. ग. जाधव यांचे औरंगाबादशी घनिष्ठ संबंध...
थोर साहित्यिक व समीक्षक रा. ग. जाधव यांचे औरंगाबादशी घनिष्ठ संबंध होते. ते औरंगाबादेत जानेवारी २००४ मध्ये झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते. देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर हे साहित्य संमेलन झाले होते. मधुकरअण्णा मुळे, दिवंगत मोरेश्वर सावे व डॉ. वासुदेव मुलाटे ही मंडळी या संमेलनाच्या संयोजन समितीत कार्यरत होती. शरद पवार यांचे या संमेलनात भाषण झाले होते. जेम्स लेन प्रकरण त्यावेळी गाजत होते.
मराठीसारखी लोकभाषा ज्ञानभाषा व्हावी, अशी भावना रा. ग. जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली होती. त्यांनी त्यावेळी उपस्थित केलेले मुद्दे आजही जसेच्या तसे लागू पडतात. कानावर पडणारे व झटपट तोंडावर येणारे चलनातील इंग्रजी व हिंदी शब्द, वाक्प्रचार, वाक्ये भाषिक आळसामुळे सर्रास वापरली जातात. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा त्रैभाषिक संकराची जाहिरातबाजीही वाढत आहे. काही वृत्तपत्रेही अशा भाषिक संकराला लळा लावताना दिसतात. भाषिक संकराचे हे चकाकते सोने मुळात कथलाचे आहे, हे आपण कधी ओळखणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ते आणखी म्हणाले होते की, अवघा मराठी समाजच भाषिक द्विधावृत्तीने ग्रासलेला आहे. मातृभाषेबद्दलचे अज्ञान, आळस, गहाळपणा व वरवर चकाकणाऱ्या भाषिक संकराला सोने समजण्याचा भ्रम यांचे निरसन करण्याची इच्छाशक्तीच आपण हरवून बसलो आहोत. दुकानाच्या पाट्या मराठी असाव्यात, असा नियम असूनही मुंबई महापालिक ा तो अंमलात आणत नाही. आपल्या समग्र भाषिक व्यवहार क्षेत्रात मराठी भाषेला सुप्रतिष्ठित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी. मराठी भाषेबद्दलच्या कचखाऊ व दुबळ्या वैफल्याच्या प्रतिमा आपण हद्दपार कराव्यात. वर्तमानकालीन भयग्रस्त मानवाला मराठी साहित्याने जगण्याचा कणखरपणा व दिलासा देणे आवश्यक आहे. यासाठी सांस्कृतिक गांभीर्य बाळगण्याचे, व्रतस्थ कलावाङ्मयीन प्रवृत्तीचे संवर्धन करण्याचे, ज्ञानोपासनेचे महत्त्व जाणून घेण्याचे व वैचारिक सहिष्णुतेचा अंगीकार करण्याचे माझे सांगणे आहे. मराठी जीवनाची काळजी घ्या, त्याला युयुत्सु संपन्न व सुसंस्कृत व न्याय्य बनवा, असे आवाहन जाधव यांनी केले होते.

Web Title: Marathi Samiti's unique 'Raga' has lost its charm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.