मराठा समाजाचा एल्गार
By Admin | Updated: October 18, 2016 00:36 IST2016-10-18T00:35:30+5:302016-10-18T00:36:31+5:30
सिल्लोड :सोमवारी मराठा समाजाची अभूतपूर्व एकजूट बघायला मिळाली.

मराठा समाजाचा एल्गार
सिल्लोड : कोपर्डी घटनेचा निषेध, आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व इतर विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने सिल्लोड शहरात सोमवारी मराठा समाजाची अभूतपूर्व एकजूट बघायला मिळाली. शिस्त व संयमाचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या या तालुकास्तरीय मोर्चात लाखो समाजबांधवांनी सहभाग नोंदवला. तालुक्याच्या इतिहासात हा मोर्चा सर्वात मोठा ठरला.
सिल्लोड येथील संभाजी चौकात सकाळी ११ वाजता सर्व मराठा बांधव जमा झाले. ११.४५ वाजता तेथून शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा भगतसिंग चौकातून आंबेडकर चौकात आल्यानंतर तेथे त्याचे सभेत रूपांतर झाले. शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील परिसरात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातून आलेले विविध पदाधिकारी जनतेत बसले होते. शिवकन्यांनी मंचाचा ताबा घेतला होता. मंचावर उपस्थित शिवकन्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव मोहिते यांना दिले.
खुलताबादेतही एकजूट
खुलताबाद : खुलताबाद तालुक्याच्या इतिहासात प्रथमच सकल मराठा समाज मोठ्या संख्येने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला. सोमवारी संपूर्ण खुलताबाद शहर विराट मूक मोर्चामुळे भगवेमय झाले होते. तालुकाभरातून हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, युवक, युवती मोर्चात सहभागी झाले होते.
दुपारी १२.०५ वाजता भद्रा मारुती मंदिरापासून क्रांती मूक मोर्चाला प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपासूनच भद्रा मारुती मंदिर परिसरात समाजबांधवांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. मोर्चाचे संचालन करण्यासाठी ११०० स्वयंसेवक नेमण्यात आले होते. सिल्लोडच्या मोर्चासारखीच वेशभूषा येथेही दिसली. मोर्चावर देखरेख ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅ मेरे लावण्यात आले होते.
मोर्चाच्या सुरुवातीला बैलगाडीचा सुंदर रथ सजवण्यात आला होता व या रथात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. या रथाच्या पाठीमागे तीन घोडेस्वार छत्रपतींच्या वेशात होते. यानंतर मोर्चेकरी शांतपणे शिस्त, संयमाने लहानी आळी, मोठी आळी, जुने पोलीस ठाणे, बाजार गल्ली, फर्श मोहल्ला, वडाची आळी, जुने बसस्थानक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयासमोर आले. या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सात मुलींच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अरुण जऱ्हाड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर परत भद्रा मारुती मंदिरासमोरील प्रांगणात मोर्चा येऊन सभेत रूपांतर झाले.