मराठा सेवा संघ महाअधिवेशनाची जय्यत तयारी
By Admin | Updated: December 17, 2015 00:20 IST2015-12-16T23:44:28+5:302015-12-17T00:20:26+5:30
नांदेड : मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त अकोला येथे महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

मराठा सेवा संघ महाअधिवेशनाची जय्यत तयारी
नांदेड : मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त अकोला येथे महाअधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांनी पत्रपरिषदेत दिली.
रौप्य महोत्सवी अधिवेशन २४,२५ व २६ डिसेंबर रोजी होत असून त्यात मनोरंजन, प्रबोधन, महिला व युवकांचे विविध प्रश्न यासह अनेक जाती जमातींच्या ३१ संघटनांचे प्रदेश प्रतिनिधी एकाच विचारमंचावर दिसणार आहेत. या अधिवेशनासाठी राज्यभरातून १ लाख लोक येणार आहेत़ २४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अकोला शहरातून मिरवणुकीने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. २५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तर युवराज छत्रपती संभाजी राजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे, महसुलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती राहणार आहे.स्वागताध्यक्ष पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील राहणार आहेत. डॉ.रुख्माबाई राऊत आरोग्य कक्षातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. दुपारच्या सत्रात आयपीएस, आयएएस अधिकारी मार्गदर्शन करतील. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी चित्रपट, टि.व्ही.नाटक,कलाकारांचा सहभाग असलेल्या संगीत रजनी होणार आहे़
२६ रोजी शाहिरांचे पोवाडे, प्रसिद्ध सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराजांची सत्यवाणी होणार आहे़ दुसऱ्या सत्रात प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रारबाहेरील मराठा समाज व त्यांचा समन्वय या विषयावर विचारमंथन होणार आहेत. समारोप दुपारी ३ ते ६ या वेळेत वसंतराव बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून बी. जी. कोळसे पाटील, शिवराज महाराज, बद्रीनाथ महाराज तनपुरे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, पत्रकार ज्ञानेश महाराव आदी उपस्थित राहतील. नांदेड जिल्ह्यातून १५०० समाजबांधव जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंजि. शिवाजीराजे पाटील, प्रा. डॉ. गणेश शिंदे, इंजि. शे. रा. पाटील, व्ही. डी. शिंदे, डॉ. सुरेश कदम, सदाशिव पाटील, पंडीत कदम, पंडित पवळे, श्यामसुंदर शिंदे, जिल्हाध्यक्ष सोपानराव क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)