मराठा आरक्षणासाठी ‘छावा’ रस्त्यावर
By Admin | Updated: November 21, 2014 00:47 IST2014-11-21T00:36:47+5:302014-11-21T00:47:43+5:30
लातूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले होते. मात्र नूतन सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही

मराठा आरक्षणासाठी ‘छावा’ रस्त्यावर
लातूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले होते. मात्र नूतन सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. दरम्यान, स्थगिती उठविण्यासाठी न्यायालयाकडे नव्या सरकारने पाठपुरावा करावा, या प्रमुख मागणीसाठी छावा संघटनेने गुरुवारी लातूर बंद पाळला. या बंदला लातुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. या समितीने शासनाकडे अहवाल सादर करून मराठा आरक्षण जाहीर केले. आरक्षणासाठी कायद्याच्या सर्व बाजू मजबूत करून केंद्र शासनाकडे मराठा आरक्षणाचा अहवाल पाठविला होता. तो अहवाल पास करून मंजुरी दिली गेली. परंतु, न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. भाजप सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप करीत छावा संघटनेने गुरुवारी लातूर बंद पाळला. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील, विजयकुमार घाडगे-पाटील, अॅड. गणेश गोमचाळे, बाळासाहेब जाधव, बालाजी निकम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आरक्षणावरील स्थगिती रद्द होण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करावा. अन्यथा छावा संघटना मोठे जनांदोलन उभे करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात अॅड. गणेश गोमचाळे, बाळासाहेब जाधव, बालाजी निकम, दीपक नरवडे, निलेश बाजुळगे, नागेश मुगळे, दादा पवार यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)