पैठणमध्ये मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार
By Admin | Updated: November 7, 2016 01:07 IST2016-11-07T00:40:11+5:302016-11-07T01:07:50+5:30
पैठण : सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी पैठणकरांनी अनुभवला. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या अभूतपूर्व मोर्चात महिला व तरुणींची संख्या लक्षणीय होती.

पैठणमध्ये मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार
पैठण : सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी पैठणकरांनी अनुभवला. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या अभूतपूर्व मोर्चात महिला व तरुणींची संख्या लक्षणीय होती. अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चाने पैठण शहर गजबजून गेले होते. दरम्यान, याच काळात ग्रामीण भागात मोठा शुकशुकाट निर्माण झाला होता.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथे झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे विक्रम पैठण येथे झालेल्या विक्रमी गर्दीने मोडीत काढले. सकाळपासूनच शहरातील सर्व रस्ते गर्दीने ओसंडून वाहत
होते.
शिवाजी चौकातील व्यासपीठापासून निघणारे सर्व रस्ते शहराबाहेरपर्यंत खचाखच भरलेले होते. व्यासपीठावरील पंचकन्यांचे भाषण व निवेदन ऐकू यावे यासाठी या व्यासपीठावरून बोललेला आवाज सर्व रस्त्यांनी पाच किलोमीटरपर्यंत जाईल, अशी ध्वनिप्रक्षेपन व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या समाजबांधवांना मोठे समाधान लाभले. मोर्चासाठी लाखो समाजबांधवांनी हजेरी लावल्याचा दावा आयोजक व पोलिसांनी केला. या मोर्चात तालुक्यातील प्रत्येक गावातील समाजबांधव सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपये देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांंचे निवेदन समाजाच्या वतीने व्यासपीठावरून विद्यार्थिनींनी वाचले.
सकाळपासूनच पैठण शहरात येणाऱ्या विविध रस्त्यांवरून भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे घेतलेले मोर्चेकरी आपल्या वाहनांमधून शहरात दाखल होत होते.
येथील कावसनकर स्टेडियमवर सर्व मोर्चेकरी लाखोंच्या संख्येने जमा झाल्यानंतर ना आवाज ना घोषणा, अगदी शिस्तबद्धपणे, शांततेत दुपारी १२ वाजता मूक मोर्चास प्रारंभ झाला. कै. दिगंबरराव कावसनकर स्टेडियमपासून मूक मोर्चा उद्यानमार्गे खंडोबा चौक, बसस्थानक, महाराणा प्रताप चौकमार्गे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकात पोहोचला.
येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर मराठा समाजाच्या व्यथा व विविध समस्यांवर प्रकाश टाकणारे मनोगत व्यासपीठावरील मुलींनी व्यक्त केले.
या मोर्चात सहभागी मराठा बांधवांना शहरातील मुस्लिम, राजपूत (परदेशी), जैन समाजाच्या वतीने व विविध संघटनांच्या वतीने विविध चौकांत मोर्चेकऱ्यांना पिण्याचे पाणी व अल्पोपाहाराची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या समाजाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मोर्चेकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देत होते.
या समाजास पाठिंबा असल्याचे मोठमोठे फलक शहरात लावले होते. शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर समाजाच्या पंचकन्यांनी जमा झालेल्या लाखो समाजबांधवांसमोर बोलताना कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबरोबरच मराठा समाजाला आरक्षण व विविध मागण्या शासनाने मंजूर कराव्यात, अशी मागणी केली. मोर्चासाठी समाजाचे शेकडो स्वयंसेवक विविध चौकांत तैनात होते.