मराठवाडा विकास मंडळाला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:36 IST2017-07-28T00:36:33+5:302017-07-28T00:36:33+5:30
औरंगाबाद : केवळ आणि केवळ खुळखुळा बनलेल्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला २०२० पर्यंत मुदतवाढ आहेच; पण अधिकार मात्र काहीही दिलेले नाहीत.

मराठवाडा विकास मंडळाला मुदतवाढ
स. सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केवळ आणि केवळ खुळखुळा बनलेल्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला २०२० पर्यंत मुदतवाढ आहेच; पण अधिकार मात्र काहीही दिलेले नाहीत. त्यातही ‘वैधानिक’ हा शब्द काढल्याने व २०११ पासून नियमित अध्यक्ष नेमला गेला नसल्याने शासनाच्या लेखी आता अशी मंडळे गुंडाळता येत नाहीत, म्हणून चालू ठेवण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
ज्यांच्या आग्रही मागणीमुळे व त्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे हे मंडळ अस्तित्वात आले, त्या गोविंदभाई श्रॉफ यांची काल जयंती होती. त्यानिमित्त स्वामी रामनानंद तीर्थ संशोधन केंद्रातर्फे ‘मराठवाडा विकास मंडळ : वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते.
त्यावेळी झालेल्या चर्चेत या मंडळाच्या कक्षा आणखी वाढवाव्यात व विविध ज्वलंत प्रश्नांच्या सर्वेक्षणाचे काम मंडळामार्फत करवून घेण्यात यावे, अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सध्या जेमतेम अधिकारी - कर्मचारी असलेल्या मंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयांशी संपर्क साधला असता, तेच गाºहाणे पुन्हा ऐकायला मिळाले. पूर्णवेळ अध्यक्ष नाही.
नेमला जाण्याचीही शक्यता नाही, त्यामुळे गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेसमोरील अध्यक्षांचा कक्ष कैक दिवसांपासून बंदच आहे. डॉ. अशोक बेलखोडे हे मंडळाच्या आरोग्य विभागाचे एक सदस्य आहेत. त्यांनी किनवट भागातील बालमाता मृत्यू प्रकरणाच्या व मराठवाड्यातील मुलींच्या वसतिगृहाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी १ लाख ७५ हजारांचे बिल मंजुरीसाठी पाठवले आहे. ते मंजूर करण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांच्यासारखे सदस्य व्यासंगी व मराठवाड्याच्या विकासाचा ध्यास असल्याने कधीमधी मंडळाच्या कार्यालयात येऊन बसतात. यापलीकडे काही नाही.