अनेक शाळांची खिचडी बंद
By Admin | Updated: April 16, 2015 01:00 IST2015-04-16T00:00:59+5:302015-04-16T01:00:54+5:30
औरंगाबाद : दुष्काळामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेता संपूर्ण सुटीमध्ये मे महिन्यात खिचडी शिजविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला

अनेक शाळांची खिचडी बंद
औरंगाबाद : दुष्काळामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड लक्षात घेता संपूर्ण सुटीमध्ये मे महिन्यात खिचडी शिजविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी तांदळाचा पुरवठा न झाल्यामुळे मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये खिचडी शिजणे बंद आहे.
औरंगाबाद तालुक्यातील कचनेर, गारखेडा या दोन केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील तांदूळ व डाळी संपल्यामुळे दि.२७ मार्चपासून खिचडी शिजवणे बंद आहे. आपल्या शाळेतील तांदूळ तसेच अन्य धान्याचा साठा संपल्याचे ५० टक्के मुख्याध्यापकांनी कळवूनही पुरवठादारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे शाळांचे म्हणणे आहे. त्यामुळे तब्बल १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन आहार मिळत नाही. एप्रिल व मे महिन्यातील तांदळाचे नियतन अद्यापही जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांना पोहोचले नसल्याने बहुतांश शाळांत खिचडी शिजणे मागील चार दिवसांपासून बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही शाळांकडे पुढील दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे खिचडी शिजविण्याची टक्केवारी पूर्ण व्हावी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी दि.१० ते ३० एप्रिल या कालावधीत गणित शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे.
तक्रारही नाही
विशेष म्हणजे या प्रकरणाची साधी तक्रार संबंधित गावच्या शालेय व्यवस्थापन समितीने किंवा मुख्याध्यापकांनी केलेली नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीत मुख्याध्यापकांनी हा प्रश्न उपस्थित मात्र केला होता.