गुरुद्वारा प्रशासकीय समितीच्या निष्क्रियतेमुळे अनेक समस्या

By Admin | Updated: September 11, 2014 00:41 IST2014-09-11T00:41:11+5:302014-09-11T00:41:55+5:30

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड नांदेड: गुरुद्वारा सचखंडच्या प्रशासनिक व्यवस्थेकरिता महाराष्ट्र शासनाने प्रशासन समितीची नियुक्ती केली

Many problems due to inefficiency of the Gurdwara Administrative Committee | गुरुद्वारा प्रशासकीय समितीच्या निष्क्रियतेमुळे अनेक समस्या

गुरुद्वारा प्रशासकीय समितीच्या निष्क्रियतेमुळे अनेक समस्या

अमरिकसिंघ वासरीकर, नांदेड
नांदेड: गुरुद्वारा सचखंडच्या प्रशासनिक व्यवस्थेकरिता महाराष्ट्र शासनाने प्रशासन समितीची नियुक्ती केली. परंतु प्रशासकीय समितीच्या निष्क्रीय कार्यपद्धतीमुळे नित्य उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास बोर्ड प्रशासनाला अपयश येत असल्याचे पहावयास मिळत आहे.
गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्र शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या प्रशासनाकरीता नुकतीच प्रशासकीय समिती गठीत केली. या समितीच्या अध्यक्षपदी सनदी अधिकारी विजय सतबीरसिंघ यांची नियुक्ती केली. या समितीच्या वतीने गुरुद्वारा बोर्डाचा कारभार पहावा, असे अपेक्षित आहे. परंतु अध्यक्षांना गुरुद्वाराच्या प्रशासनिक कामात लक्ष देण्याकरीता वेळ नसल्याने तेथे विविध समस्या निर्माण होत आहेत.
बोर्ड प्रशासनाकडे शिरेपावचा असलेला साठा पूर्णपणे संपला असून नवीन खरेदीसंदर्भात निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे गुरुद्वाराच्या पूजा-अर्चनेत इतर साहित्य, रुमालेचा वापर करावा लागत आहे. यामुळे भाविकांत मोठा रोष निर्माण होत आहे.
गुरुद्वारामध्ये व परिसरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचा निर्णय देखील प्रलंबित आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले गुरुगोविंदसिंघजी वास्तुसंग्रहालय अद्यापही पूर्णत्वास गेले नसून केवळ इमारत उभी करण्यात आली आहे.
दशमेश हॉस्पिटल हे गुरुद्वारा प्रशासनामार्फत चालविण्यात येते. येथील लाखो रुपये खर्च करुन आणण्यात आलेली एक्सरे मशीन गेल्या अनेक दिवसांपासून चालकाच्याअभावी बंद पडून आहे. यामुळे येणाऱ्या रुग्णांना अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे. प्रतिवर्षी दसरा उत्सव सचखंड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. याकरीता देश-विदेशातून लाखो भाविक येथे येतात.
त्याकरीता मोठ्या प्रमाणावर व्यवस्थेचे नियोजन करावे लागते. उत्सवात सहभागी होण्याकरीता लहेंगसिंघांचे दल आपल्या घोडस्वारांसह सचखंड येथे दाखल होतात. येथे नित्य येणाऱ्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात व दसरा उत्सव निर्विघ्न संपन्न व्हावा, याकरीता तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी शीख समाजातून होत आहे.

Web Title: Many problems due to inefficiency of the Gurdwara Administrative Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.