अनेकांनी साधला ‘सुवर्ण’योग

By Admin | Updated: March 28, 2017 23:34 IST2017-03-28T23:34:10+5:302017-03-28T23:34:51+5:30

लातूर मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढी पाडव्याचे महत्त्व आहे.

Many people used to get 'golden' sum | अनेकांनी साधला ‘सुवर्ण’योग

अनेकांनी साधला ‘सुवर्ण’योग

राजकुमार जोंधळे  लातूर
मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढी पाडव्याचे महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने खरेदी करीत ‘सुवर्ण’योग साधला. लातूरच्या बाजारपेठेत गुढी पाडव्याचा उत्साह व्यापाऱ्यांमध्ये दिसून येत होता. सराफा बाजार आणि वाहन बाजारात शेकडो कोटींची उलाढाल झाली आहे. काहींनी घर खरेदी करीत पाडव्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेशाचाही मुहूर्त साधला.
नोटाबंदीच्या तडाख्यानंतर सराफा, वाहन आणि रिअल इस्टेटचा बाजार गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सावरला आहे. खरेदीतून झालेल्या कोट्यवधींच्या आर्थिक उलाढालीमुळे चैतन्याची गुढी उभारली. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे चित्र दिसत होते. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पीकपाणी उत्तम आणि शेती फायद्याची ठरली. त्यामुळे बाजारात पैसा आला. विशेषत: गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून सराफा बाजारपेठेत ग्राहकांची दिवसभर गर्दी होती. लातूर शहरातील सोन्या-चांदीचे व्यापारी मोहन जाधव रामेगावकर म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा सराफा बाजारातील चित्र समाधानकारक आहे. गुढी पाडव्यानिमित्त अनेकांनी सराफा बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे यंदाचा व्यवसाय चांगला असल्याचेही ते म्हणाले.
लातूर शहरातील विविध चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे शोरुमही ग्राहकांच्या गर्दीने फुलले होते. अनेकांनी दुचाकींसह चारचाकी खरेदी करून सेल्फीचा आनंद लुटला. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारातही ग्राहकांची गर्दी होती. पाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल होता. कुलर, एसी, फ्रीज, एलसीईडी, मोबाईल, लॅपटॉप आदी वस्तूंवर व्यापाऱ्यांनी विविध आॅफर ग्राहकांसाठी जाहीर केल्या होत्या. त्यामुळे अनेकांना एका वस्तूवर ३० टक्के आर्थिक सूट मिळाली. विशेषत: उन्हाळ्याचे दिवस असल्याने एसी, फ्रीज आणि कुलरची विक्री झाली. याही बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. लातूर शहरातील सराफा बाजारात जवळपास २०० सराफा व्यापाऱ्यांची दुकाने आहेत तर जिल्हाभरात एकूण एक हजार सराफा व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. त्यामुळे या बाजारात किमान १०० कोटींच्या घरात सोने खरेदीची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सोने खरेदीबरोबरच चांदीच्या दागिन्यांचीही खरेदी करण्याकडे महिला ग्राहकांचा कल होता. नोटाबंदीच्या काळात २६ हजारांवर असलेल्या सोन्याचा प्रती तोळा भाव २९ हजारांपर्यंत पोहोचला आहे. पाडव्याला सोने खरेदी करणे हा शुभमुहूर्त समजला जातो. दिवाळीचा पाडवा आणि गुढीपाडवा या दोन्ही दिवशी सोने खरेदी करण्याला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे.

Web Title: Many people used to get 'golden' sum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.