शहरातील अनेक भागांत निर्जळी, नागरिक त्रस्त
By Admin | Updated: May 8, 2016 23:35 IST2016-05-08T23:16:53+5:302016-05-08T23:35:30+5:30
जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

शहरातील अनेक भागांत निर्जळी, नागरिक त्रस्त
जालना: शहर अंतर्गत तसेच जायकवाडी ते जालना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या प्रकाराकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात गत आठ ते दहा दिवसांपासून विविध भागांतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
घाणेवाडी जलाशय पूर्णपणे कोरडाठाक पडल्याने नवीन जालना भागातील रहिवाशांना जायकवाडी ते जालना जलवाहिनीवर अवलंबून रहावे लागते आहे. मात्र, अंतर्गत जलवाहिनीला गळती लागल्याने नागरिकांना वेळे तसेच योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही. नवीन तसेच जुना जालना भागातील रहिवाशांना विकतच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. कादराबाद, कन्हैयानगर, पॉवरलूम, बडीसडक, कॉलजेरोड, पेन्शनपुरा, मोदीखाना, रागनगर, कचेरी रोड, नूतन वसाहत, चंदनझिरा, लालबाग परिसर, संभाजी नगर आदी भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे काही भागांत जलवाहिनी नसल्यानेही नागरिकांचे हाल होत आहेत. ज्या भागात जलवाहिनी असली तरी पालिकेच्या दुर्लक्षामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.
विशेष म्हणजे अंतर्गत जलवाहिनीची चाळणी झाल्याने नागरिकांना पाण्यापासूचन वंचित रहावे लागत आहे. अनेक भागांत जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने हाल होत आहेत. (प्रतिनिधी)
जायकवाडी ते जालना या जलवाहिनीवर शंभरपेक्षा अधिक व्हॉल्व्ह आहेत. या व्हॉल्व्हला लोखंडी जाळी बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. चार महिन्यांनंतर लोखंडी जाळीही बसलेली नाही.
४अंबड तसेच पाचोड रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी व्हॉल्व्हमधून बिघाड करून पाणी चोरी सुरू केली आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने पालिका दुरूस्ती कधी करणार असा सवाल उपस्थित होत आहे.
कडक उन्हामुळे बहुतांश भागातील कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. काही नागरिकांना दररोज जारचे पाणी घेणे सुरू केले आहे.
४काहींनी तर महिनेवारी जार लावले आहेत. उद्योग, व्यावसायिक प्रतिष्ठानांनंतर आता घरगुतीही जारचा महिना लावलेला आहे. टँकरचे दरही शंभर ते पाचशे रूपयांदरम्यान आहे.
जायकवाडी ते जालना जलवाहिनी अंबड रस्त्यावर तसेच टीव्ही सेंटर परिसरात अनेक ठिकाणी फुटलेली आहे. किरकोळ दुरूस्ती केल्यानंतर पालिकेकडून कोणतीच चांगली दुरूस्ती होत नसल्याने दररोज पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळेही शहरात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीही अंबड रस्त्यावर जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.