अर्थसंकल्पातील अनेक बाबी राहिल्या कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:59 IST2016-03-29T00:06:59+5:302016-03-29T00:59:14+5:30
औरंगाबाद : विद्यापीठात अत्याधुनिक वर्गखोल्या, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, कुलसचिवपद भरणे, गोपीनाथ मुंडे अध्यासन, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम,

अर्थसंकल्पातील अनेक बाबी राहिल्या कागदावर
औरंगाबाद : विद्यापीठात अत्याधुनिक वर्गखोल्या, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, कुलसचिवपद भरणे, गोपीनाथ मुंडे अध्यासन, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि इतर अनेक बाबी उभारण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला चालू आर्थिक वर्षात विसर पडल्याचे दिसते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भरीव कामगिरी तर विद्यापीठाला करता आली नाहीच. उलट विद्यापीठ फंडाची (विद्यार्थ्यांचा पैसा) मोठ्या प्रमाणावर झालेल्या उधळपट्टीमुळे विद्यापीठ चर्चेत राहिले.
२०१५-१६ सालच्या विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात काही उद्दिष्टे ठरविण्यात आली. मात्र, त्यांची पूर्तता करण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसते. विद्यापीठाच्या काही विभागात डिजिटल किंवा अत्याधुनिक वर्गखोल्या उभारण्याचा संकल्प यंदा पूर्ण होऊ शकला नाही.
‘व्हर्च्युअल’ क्लासरूमसाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र, त्याची पूर्तता होऊ शकली नाही. सुसज्ज प्रयोगशाळेचा संकल्पही तडीस गेलेला नाही. विद्यापीठ परिसरात सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क उभारणे, गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संशोधन संस्था किंवा अध्यासन उभारणे. यापैकी एकाचीही पूर्तता होऊ शकली नाही. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉटस् हे दोन अभ्यासक्रम नव्याने सुरू करावयाचे विषय कागदावरच राहिले. इतिहास वस्तू संग्रहालयासमोर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची गोष्टही प्रशासन विसरून गेले. हा विषयच समोर येणार नाही, याची काळजी प्रशासनातील मंडळींनी घेतल्याचे दिसते. याबाबत नेमलेली समितीही गाफीलच राहिली.
विद्यार्थी हा केंद्रबिंदू असलेल्या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी कोणतीही भरीव कामगिरी विद्यापीठातर्फे झाली नाही. मुलींसाठी नव्याने सुरू झालेले एक वसतिगृह सोडता इतर कोणत्याही नव्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी तयार झाल्या नाहीत.
विद्यार्थी कल्याण विभागाला विद्यार्थ्यांच्या भोजनाचा वर्षभर चिघळत राहिलेला विषय व्यवस्थित हाताळता आला नाही. त्यामुळे जेवणावरून विद्यापीठात अनेक वेळा गदारोळ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. विद्यार्थ्यांना दर्जेदार कँटीनची सुविधा मिळावी, असे मात्र कुणालाही वाटत नसल्याचे दिसले.