पैठणच्या मतदार यादीत अनेक बोगस नावे
By Admin | Updated: October 19, 2016 01:08 IST2016-10-19T00:51:51+5:302016-10-19T01:08:07+5:30
संजय जाधव , पैठण नगर परिषद पैठण निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत बाहेर गावातील मतदारांची नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

पैठणच्या मतदार यादीत अनेक बोगस नावे
संजय जाधव , पैठण
नगर परिषद पैठण निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत बाहेर गावातील मतदारांची नावे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जी नावे पैठण मतदार यादीत नव्याने समाविष्ट करण्यात आली, अशा मतदारांची नावे त्यांच्या मूळ गावातील मतदार यादीत कायम आहेत. या वरून मतदार यादीत नावे समाविष्ट करताना निवडणूक विभागाने कुठलीही खातरजमा केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी नावे वगळण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार देऊन करण्यात आली आहे. याबाबत आयोग काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
पैठण नगर परिषद निवडणूक दि. १८ डिसेंबर २०१६ ला होत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी यांनी प्रारूप मतदार यादी १० आॅक्टोबर रोजी प्रसिध्द केली. या यादीत अनेक प्रभागात अनोळखी नावे समाविष्ट करण्यात आल्याचे या यादीचे अवलोकन केल्यानंतर समोर आले. या मुळे या प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मोठा झटका बसला. अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार यादीत नावे आलेल्या मतदारांचा शोध घेतला, परंतु हे मतदार त्यांना कुठेच मिळून आले नाही. वास्तविक हे मतदार शहरात राहात नसल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड यांनी मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद पैठण, यांना निवेदन देऊन ही नावे वगळण्यात यावी, अशी लेखी तक्रार केली आहे. या तक्रारी सोबत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची पैठण शहरात व इतर गावात अशा दोन्ही मतदार यादीत नाव असलेली यादी दोन्ही ओळखपत्र क्रमांकासह सादर केली आहे.
जाणीवपूर्वक नोंदणी
निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक बीएलओ यांना हाताशी धरून काही जणांनी मतदार यादीत ही नावे समाविष्ट करण्यात आल्याची शहरात चर्चा होत आहे. आज प्रभाग क्रमांक सात मध्ये जवळपास १०० बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या बोगस मतदारांमुळे या प्रभागातील मतदारांच्या निवड क्षमतेवर अन्याय होणार आहे अशी भावना या प्रभागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
पैठण शहर मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या यादीत आडूळ, विहामांडवा, पाचोड, बिडकीन व इतर गावातील मतदार यादीतील नावे समाविष्ट करण्यात आल्याचे उघड झाले आहे. वास्तविक पाहता मतदार यादीत नावे समाविष्ट करताना बी.एल. ओ. ने सदरील मतदारांचा निवासाचा पुरावा घेतल्यानंतरच अशी नावे समाविष्ट करता येतात. परंतु येथे नव्याने नाव समाविष्ट करताना बी.एल.ओ. यांनी याबाबत दक्षता घेतली नसल्याचे दिसून आले आहे.