जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या उघड्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:31 IST2017-09-03T00:31:02+5:302017-09-03T00:31:02+5:30
जिल्ह्यातील मंजूर अंगणवाड्यांच्या बांधकामांना अद्याप सुरूवात झाली नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाजमंदिर, खाजगी इमारतीत भरविल्या जात आहेत़

जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या उघड्यावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यातील मंजूर अंगणवाड्यांच्या बांधकामांना अद्याप सुरूवात झाली नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाजमंदिर, खाजगी इमारतीत भरविल्या जात आहेत़
जिल्ह्यात २०१६-१७ साठी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते़ यावेळी ९०० प्रस्ताव प्राप्त झाले होते़ त्यापैकी ६०० प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत़ किनवट व माहूर या तालुक्यांतील अंगणवाड्यांना प्रत्येकी साडेसहा लाख रूपये तर इतर तालुक्यातील अंगणवाड्यांना ६ लाख रूपये बांधकामासाठी निधी देण्यात येणार आहे़ अंगणवाडी इमारतीत किचनशेड, शौचालय बांधले जाणार आहेत, परंतु या अंगणवाडी बांधकामांना अद्याप सुरूवात झाली नाही़ शासनाच्या नवीन धोरणानुसार मंजूर झालेल्या अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी आता नवीन मॉडेल तयार करण्यात येत आहे, परंतु या मॉडेलची रचना तयार करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ पायाभूत शिक्षण दर्जेदार देण्यासाठी अंगणवाड्यांचे स्वरूप बदलण्यात येणार आहे़ मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ आजही वस्ती, वाडे, तांडे, ग्रामीण भागात गरिबांची मुले उघड्यावर अक्षरे गिरवताना दिसत आहेत़ काही गावांत समाजमंदिर, मंदिरात या अंगणवाड्या भरविण्यात येत आहेत़