शनिवार ठरला अपघातवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:09 IST2017-09-17T01:09:56+5:302017-09-17T01:09:56+5:30

सप्टेंबर महिन्यातील आजचा तिसरा शनिवार औरंगाबादकरांसाठी अपघातवार ठरला. दिवसभरात झालेल्या पाच अपघातांत ५ जणांचे बळी गेले आणि ८ जण जखमी झाले

Many accidents on saturday | शनिवार ठरला अपघातवार

शनिवार ठरला अपघातवार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सप्टेंबर महिन्यातील आजचा तिसरा शनिवार औरंगाबादकरांसाठी अपघातवार ठरला. दिवसभरात झालेल्या पाच अपघातांत ५ जणांचे बळी गेले आणि ८ जण जखमी झाले. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चिकलठाणा ते के म्ब्रिज शाळा चौक परिसरात लहान-मोठे दोन अपघात झाले. जीपने चिरडल्याने चार जण ठार आणि दोन जखमी झाले, तर भरधाव कार दुचाकीस्वारांना उडवून रस्त्याशेजारी उलटल्याने दोन जण जखमी झाले. बीड बायपासवरील नाईक चौकात दुपारी कंटेनर, ट्रक आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. या घटनेत आयशरचालक आणि क्लीनर जखमी झाले. पंढरपूरमध्ये कार कंटेनरवर आदळून एक ठार व दोन जण जखमी झाले. तर सायंकाळी छावणी उड्डाणपुलावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे उड्डाणपुलावरून ट्रक मागे गेल्याने मागून येणारी सात वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना घडली.
औरंगाबाद-नगर रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून, शनिवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कंटेनर व कारच्या अपघातात एक शिक्षक ठार झाला असून, कारमधील पिता-पुत्र जखमी झाले.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले की, गिरीश प्रकाश गायकवाड (२७, रा.कडलास, ता.सांगोला जि.सोलापूर) व राहुल अरविंद महामुनी (३०, रा.महूद, ता.सांगोला) हे दोघे सोलापूर जिल्ह्यातील एका संस्थेत शिक्षक आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांना शाळेने काढून टाकले. याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यासंदर्भात औरंगाबादेतील एका वकिलांशी विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवारी हे तिघे सोलापूरहून औरंगाबादकडे निघाले होते.
कंटेनरला धडकले
गिरीश गायकवाड कार चालवीत होते. त्यांच्या डाव्या बाजूला राहुल महामुनी व पाठीमागे वडील प्रकाश गायकवाड बसले होते. शनिवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास पंढरपूरजवळील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर कंटनेरला पाठीमागून ही कार धडकली. या अपघातात राहुल महामुनी यांचा जागीच मृत्यू झाला. चालक गिरीश व प्रकाश गायकवाड हे दोघे जखमी झाले.
औरंगाबाद : जालना रोडवरील साई मंदिराजवळ भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडविल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार चार-पाच पलट्या मारत घटनास्थळापासून पाचशे फुटावर जाऊन पडली.
तान्हाजी उत्तम मुंढे (३०), अजय भोसले हे दोघे (एमएच २० बीयू ९३८०) या दुचाकीवरून टाकळी शिंपीकडे जात होते. भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच २० डीजे २४३७) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात मुंढे व भोसले जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, चिकलठाणा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण साळवे करीत आहेत.
औरंगाबाद : बीड बायपासवर दुपारी ट्रेलरवर ट्रक धडकला. ट्रक एका दुचाकीचा चुराडा करीत संरक्षक भिंतीवर आदळला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले.
बीड बायपासवरील नाईकनगरच्या चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास (एमएच २० बीटी ४४२०) या ट्रकच्या दुरुस्तीनंतर सहज ट्रायल मारत असताना नागपूरहून मुंबईकडे जाणारा ट्रक ट्रेलर (एमएच ०६ बीडी १०३९)वर जोरदार धडकला. या अपघातात ट्रकचालकाचा ताबा सुटून तो सरळ रोडच्या खाली जाऊन रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दुचाकी (एमएच २०सीझेड ३६६१)ला फरपटत नेत समोरील संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Web Title: Many accidents on saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.