मांत्रिकाने गुप्तधन काढल्याची चर्चा

By Admin | Updated: July 16, 2014 00:49 IST2014-07-16T00:22:53+5:302014-07-16T00:49:13+5:30

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बोथी गावातील एका पडक्या वाड्यामध्ये मांत्रिकाच्या सहाय्याने खोदकाम करून गुप्तधन काढण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

Mantri discusses intelligence | मांत्रिकाने गुप्तधन काढल्याची चर्चा

मांत्रिकाने गुप्तधन काढल्याची चर्चा

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बोथी गावातील एका पडक्या वाड्यामध्ये मांत्रिकाच्या सहाय्याने खोदकाम करून गुप्तधन काढण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे याची माहिती मिळूनही कारवाई न करता पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बोथी येथे एका निर्जन वाड्यात १५ दिवसांपूर्वी मांत्रिकाने पूजा-अर्चा करून मोठा खड्डा खोदला आणि त्यातून गुप्तधन काढल्यात आले. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी टिकाशीने खोदण्याचा आवाज आल्याने ‘चोर आले की काय?’ अशी शंका आल्याने त्याने आवाजाच्या दिशेने जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता मांत्रिकासह खोदकाम करणारे तेथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पडक्या वाड्यामध्ये जाऊन पाहिले असता त्याठिकाणी खड्डा खोदलेला दिसला. तसेच लिंबू व पुजेचे साहित्य दिसून आले.
या खोदकामाची माहिती पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली. परंतू या प्रकाराची कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी हे प्रकरण परस्पर मिटवले असल्याचे काही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या कामी एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने महत्वाची भूमिका निभावल्याचे सांगितले जात आहे.
मागील आठवड्यात हिंगोली शहरातही असाच प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी स्वत: सरकारतर्फे फिर्याद देऊन या प्रकरणातील आरोपींविरूध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांना गजाआड केले. परंतु बोथी येथे घडलेला गुप्तधन काढण्याचा प्रकार पोलिस दडपत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आखाडा बाळापूर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांना विचारले असता, सदरील प्रकाराबाबत आपणास काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Mantri discusses intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.