‘मांजरा’चा झराही आटला !

By Admin | Updated: July 12, 2014 01:14 IST2014-07-12T00:12:14+5:302014-07-12T01:14:55+5:30

लातूर : लातूरकरांना पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

'Manjra' fountain! | ‘मांजरा’चा झराही आटला !

‘मांजरा’चा झराही आटला !

लातूर : लातूरकरांना पावसाळ्यात पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले असून, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराच्या अनेक भागांत १५ दिवस लोटले तरी नळाला पाणी आले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय आहे. पाण्यासाठी वाढती ओरड लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने शहरात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. आठवडाभरात चार टँकर वाढले आहेत. पुढील आठवड्यात आणखी टँकर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. चर खोदूनही पंपाला पाणी अपुरे पडत आहे. मांजरा धरणातील झरेही आटले आहेत. धरणातील पाणीसाठा घटल्याने लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात गेल्या महिनाभरापासून पाण्यासाठी नागरिकांची ओरड वाढली आहे. सध्या मनपाच्या मालकीचे असलेल्या सार्वजनिक विंधन विहिरींचा व हातपंपाचा काही भागात आधार उरला आहे. अनेक भागांत पाण्यासाठी वादावादी होत आहे. सद्य:स्थितीेत विंधन विहिरीवरच पाणीपुरवठ्याची मदार आहे.
मांजरा धरणातून होणारा पाण्याचा उपसा अत्यल्प प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर नागझरी बंधाऱ्यातूनही पाणीसाठा कमी झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गल्लोगल्ली पाण्यासाठी नागरिकांची ओरड होत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ज्या भागात जलवाहिनी अपुरी आहे किंवा पाण्याचे स्त्रोत नाहीत, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लेबर कॉलनी, सम्राट चौक, काजी मोहल्ला, अंजली नगर आदी भागांत सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सध्या शहरात १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात चार टँकरची भर पडली आहे. पाऊस न पडल्यास आणखी टँकर वाढतील. त्यामुळे शहरातील पाणी असलेल्या खाजगी मालकीच्या विंधन विहिरी अधिग्रहण करण्याचा विचार मनपा करीत आहे.
पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले...
मांजरा व नागझरी प्रकल्पातून पाणीसाठा घटल्याने शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वेळापत्रकाचे नियोजन कोलमडले आहे. १ ते ८ जुलैपर्यंतच्या वेळापत्रकानुसार होणारा पाणीपुरवठा १३ जुलैपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. ११ ते १८ जुलैपर्यंतचा दुसरा व २१ ते २८ जुलैपर्यंतचा तिसरा पाणीपुरवठा, २३ ते ३० जुलैपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. याच बदलाप्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
आठवडाभरात चार टँकर वाढले, आणखी वाढणार...
मांजरा प्रकल्पातील पाणी आटल्यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम
मांजरा प्रकल्पात चर खोदून पाणी उपशापर्यंत आणण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न
लातूर महानगरपालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मागील आठवड्यात १४ टँकरच्या माध्यमातून शहराच्या टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात होता. चालू आठवड्यात नागरिकांची ओरड वाढली. पाण्याचे स्त्रोत काही ठिकाणचे बंद पडल्याने चार टँकर वाढविण्यात आले आहेत.
सध्या १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पुढील आठवड्यात आणखी ४ टँकर वाढविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: 'Manjra' fountain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.