मांजरा धरणाला तडे

By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:48:14+5:302014-06-19T00:17:51+5:30

मधुकर सिरसट , केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाला तडे गेले असून एक किमी अंतरापर्यंतची भिंत खचली आहे. त्यामुळे धरणाखालील गावांना धोका निर्माण झाला आहे.

Manjra dams cracked | मांजरा धरणाला तडे

मांजरा धरणाला तडे

मधुकर सिरसट , केज
तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाला तडे गेले असून एक किमी अंतरापर्यंतची भिंत खचली आहे. त्यामुळे धरणाखालील गावांना धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या धरणाला भेगा पडूनही प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे़ त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे़
धनेगाव येथील मांजरा धरण विस्तीर्ण आहे़ तब्बल दोन हजार ३७१ चौरस किमी क्षेत्रावर असलेल्या या धरणातून विविध ठिकाणी पाणी पुरवछा केला जातो़ महत्त्वाचे म्हणजे हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आली आहे़ अशा या धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत़ तर एक किमी अंतराची भिंत खचून गेली आहे़ त्यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ दरम्यान, धरणाच्या सुरक्षिततेसाठी चार कर्मचारी तैनात आहेत; परंतु कोणाच्याही ही बाब लक्षात कशी आली नाही? याचे कोडे कायम आहे़ पावसाळ्यापूर्वी भेगा बुजविणे आवश्यक आहे़ अन्यथा भिंतीत पाणी मुरून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
म्हणे, पाहणी करतो!
मांजरा धरणाचे कार्यकारी अभियंता आऱ बी़ करपे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, असे काही झाले असेल तर माहीत नाही़ दोन दिवसांत पाहणी करुन माहिती घेतो़ पाहणी केल्यावरच दुरुस्तीबाबत उपाययोजना करु असे त्यांनी सांगितले़
शाखाधिकारी ‘आऊट आॅफ रेंज’!
मांजरा धरणाचे शाखाधिकारी एस़ डी़ पाटील हे दोन महिन्यांपूर्वीच रुजू झाले़ धरणाच्या भिंंतीला तडे गेल्यानंतर त्यांनी साधी पाहणी देखील केलेली नाही़ त्यांना संपर्क केला असता ते ‘आऊट आॅफ कव्हरेज’ होते़ त्यामुळे त्यांची बाजू घेता आली नाही.
गावे धास्तावली
मांजरा धरणाच्या पायथ्याशी लागून असलेली १४ गावे भिंतीला तडे गेल्याने धास्तावली आहेत़ आवाडचरपूरा, इस्थळ, वाकडी, सौंदाणा, देवळा या गावांसह इतर गावातील लोक चिंतातूर आहेत़ मोठा पाऊस होण्यापूर्वी धरणाच्या भिंंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे़
आभाळ दाटून आले की या भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते. एकीकडे धरण उशाला असूनही पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे मात्र मोठा पाऊस आला तर काय होईल या चिंतेने ग्रामस्थांना ग्रासले आहे. दुहेरी कोंडीत असलेल्या लोकांनी धरण दुरूस्तीची मागणी केली आहे.
अहवाल देऊनही कार्यवाही होईना
मांजरा धरणाच्या भिंतीला गेलेले तडे तसेच खचलेल्या भिंतीसंदर्भात नाशिक येथील वरिष्ठ कार्यालयाकडे महिन्यापूर्वीच अहवाल पाठविला आहे़ मात्र, अद्याप कुठलीच कार्यवाही वरिष्ठ कार्यालयानेही केलेली नाही़ दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा सुरु आहे, असे स्थापत्या अभियांत्रिकी सहायक ए़आऱ भिसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़

Web Title: Manjra dams cracked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.