मनपा लेखा विभागात लवकरच फेरबदल
By Admin | Updated: September 17, 2014 01:16 IST2014-09-17T00:59:22+5:302014-09-17T01:16:05+5:30
औरंगाबाद : महापालिका लेखा विभागात लवकरच काही कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे संकेत आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज दिले.

मनपा लेखा विभागात लवकरच फेरबदल
औरंगाबाद : महापालिका लेखा विभागात लवकरच काही कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे संकेत आयुक्त प्रकाश महाजन यांनी आज दिले. लोकमतने मंगळवारच्या अंकात लेखा विभागातील अनागोंदी स्टिंग आॅपरेशन करून चव्हाट्यावर आणली. ज्या कर्मचाऱ्यांवर अफरातफरीचे गुन्हे दाखल झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या आठवड्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये धनादेशावरून तीन वेळा हाणामाऱ्या, वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांना आयुक्तांनी गंभीरतेने घेतले आहे. पर्यायी कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लेखा विभागात पाठविण्यात येईल. जे मागील दहा- दहा वर्षांपासून त्या विभागात ठाण मांडून बसले आहेत. त्यांची बदली करण्याबाबतही प्रशासनाने विचार सुरू केला आहे.
लेखा विभागातून सध्या मर्जीतील बड्या कंत्राटदारांचे धनादेश देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लहान व किरकोळ कंत्राटदारांना कुणीही वाली नसल्यासारखे झाले आहे. त्यातूनच अधिकारी व कंत्राटदारांमध्ये हाणामारी होण्यापर्यंत मजल गेली आहे. कंत्राटदारांना कोणत्या प्राधान्याने धनादेश दिले जातात, त्याचे बिंग लोकमतने फोडल्यानंतर पालिकेत एकच खळबळ उडाली. दरम्यान लेखाधिकारी संजय पवार म्हणाले, माझा कुणाबरोबरही वाद झालेला नाही. कुणीतरी मुद्दामहून असे प्रकार पुढे आणू पाहत आहे. मंगळवारीदेखील कुठल्याही कंत्राटदाराबरोबर माझा वाद झालेला नाही. हे सगळे कोण करते आहे, कशासाठी करते आहे, हे कळण्यास मार्ग नाही.
मंगळवारच्या ‘औरंगाबाद हॅलो’मध्ये लोकमतने प्रकाशित केलेले मर्जीतील ठेकेदारांना मेवा हेच ते वृत्त.
पालिकेची फुटकळ कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी आयुक्त महाजन यांना निवेदन देऊन लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. त्या तक्रारीबाबत आयुक्तांनी विचार सुरू केला आहे.
लेखा विभागात मंगळवारी एका कंत्राटदाराने बिलासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. पालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कंत्राटदार पैसे मागण्यासाठी येत आहेत. फुटकळ कामे करणाऱ्या कंत्राटदारांची बिले मनपाने तातडीने अदा न केल्यास आगामी काळात आणखी उद्रेक होण्याची शक्यता आहे.