महिलांमध्ये दहशत माजविणाऱ्या मंगळसूत्र चोरांचे त्रिकूट जेरबंद
By Admin | Updated: December 7, 2014 00:19 IST2014-12-07T00:10:07+5:302014-12-07T00:19:19+5:30
औरंगाबाद : महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ही दहशत निर्माण करण्यात मोठा वाटा असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले.

महिलांमध्ये दहशत माजविणाऱ्या मंगळसूत्र चोरांचे त्रिकूट जेरबंद
औरंगाबाद : गेल्या वर्षभरात मंगळसूत्र चोरांनी महिलांना घराबाहेर दागिने घालून फिरणे मुश्कील करून टाकले होते. मंगळसूत्र चोरीच्या वाढलेल्या घटनांमुळे महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ही दहशत निर्माण करण्यात मोठा वाटा असणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले.
या टोळीतील विलास ऊर्फ पप्पू शंकर कांबळे (२७, रा. मिटमिटा), योगेश नारायण झळके (२७, रा. वळदगाव), विजय काशीनाथ गंगावणे (२२, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांनी शहरात आतापर्यंत केलेल्या तब्बल ४४ मंगळसूत्र चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून शहरात मंगळसूत्र चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातलेला होता. दर एक-दोन दिवसांआड शहरात कोठे ना कोठे अशी घटना घडत होती.
या सत्रामागे वरील त्रिकुटाचा हात आहे, अशी माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांना कळविली. माहिती मिळताच शोध घेऊन या तिन्ही आरोपींना अटक करण्यात
आली.
‘खाक्या’ दाखवून विचारपूस केल्यानंतर वरील आरोपींनी दोन, चार नव्हे, तर ४४ मंगळसूत्रचोरीची कबुली दिली. विशेष म्हणजे कोठून कधी मंगळसूत्र हिसकावले ती सर्व ठिकाणेही त्यांनी दाखविली. आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून २० मंगळसूत्र हस्तगत केले
आहेत.
या आरोपींकडून आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.