मनपात पुन्हा पॅचवर्क घोटाळा
By Admin | Updated: November 19, 2014 01:01 IST2014-11-19T00:43:39+5:302014-11-19T01:01:13+5:30
औरंगाबाद : महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासासाठी १ एप्रिल २०१४ ते आजपर्यंत किती ठिकाणी पॅचवर्क केले,

मनपात पुन्हा पॅचवर्क घोटाळा
औरंगाबाद : महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासासाठी १ एप्रिल २०१४ ते आजपर्यंत किती ठिकाणी पॅचवर्क केले, याचा कुठलाही लेखाजोखा अभियंत्यांकडे नसल्यामुळे पालिकेत पुन्हा २०१३ साली झालेला पॅचवर्क घोटाळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्त पी.एम.महाजन यांनादेखील अनेक कामे कागदावरच झाल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी कामांची पाहणी करून बिले अदा करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यांच्या निर्णयाला खीळ बसविण्यासाठी पालिकेतील लॉबीने पुढाकार घेतल्याचे दिसते आहे.
१८ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पॅचवर्क कुठे होत आहे. शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यासाठी प्रभागनिहाय कामांची जबाबदारी कुणावर आहे. कंत्राटदार कोण आहेत. याची माहिती सदस्य संजय चौधरी, सुरेंद्र कुलकर्णी, प्रीती तोतला, त्र्यंबक तुपे, मीर हिदायत अली, काशीनाथ कोकाटे यांनी विचारली; मात्र अभियंते काहीही बोलले नाहीत.
मनपातील अभियंते अजूनही पॅचवर्कच्या कामांकडे गांभीर्याने न पाहता घरी बसून १०० टक्के काम झाल्याचा अहवाल तयार करीत असल्यामुळे कंत्राटदारांसह अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे फावते आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना काय यातना भोगाव्या लागत आहेत, हे त्यांनाच विचारलेले बरे! खड्ड्यांकडे पालिका ‘मलिदा’ लाटण्याचे दुकान म्हणून पाहत आहे. त्यामुळेच खड्डे ‘तांत्रिक’ऐवजी ‘गावरान’ पद्धतीने बुजविले जात असल्याने मनपाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. २०११ पासून आजवर अंदाजे १५ कोटी रुपयांचा चुराडा पॅचवर्कसाठी झाला आहे. हा सर्व खर्च करूनही रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. इंडियन रोड काँगे्रसच्या मानकानुसार पॅचवर्क व्हावे. सत्ताधाऱ्यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी मागणी नागरिक करीत आहेत. कार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, गणेशोत्सवादरम्यान डी.अजितसिंग, अरोरा कन्स्ट्रक्शन्स यांनी पॅचवर्क केले. कामे कुठे सुरू आहेत, हे सदस्यांनी विचारल्यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
खड्डे पडल्यानंतर खड्ड्याची खोली, रुंदीवरून ‘स्क्वेअर डेप्ट्रँग्युलर’च्या आधारे खड्डे बुजविले जातात. बीएसबी, वेटमिक्स, डांबरी लेअर टाकून ते काम होते; पण हल्ली त्या पद्धतीने पॅचवर्क होत नाही. दोन इंच डांबराचा थर टाकून पॅचवर्क केले जात आहे. मुरूम टाकून खड्डे बुजविल्याने धुराळ्याने त्वचा व डोळ्यांचे आजार होत आहेत.
१आदिनाथ कन्स्ट्रक्शन्स, डी.अजितसिंग, अरोरा कन्स्ट्रक्शन्स, एम.ए.सिद्दीकी कन्स्ट्रक्शन्स, ए.एस.कन्स्ट्रक्शन्सकडे पॅचवर्कची कामे आहेत.
२गेल्या वर्षीची पावणेतीन कोटींची कामे बाकी असताना नवीन कामेदेखील याच कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. सध्या या कंत्राटदारांची यंत्रणा कुठे पॅचवर्क करते, हे पालिकेलाच माहिती.
शहर अभियंता एस.डी.पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे, उपअभियंता फड, कुलकर्णी, शेख खमर, पी.जी.पवार, एस.डी.काकडे, कनिष्ठ अभियंता डी.टी.डेंगळे, एस.एस.रामदासी, मो.ए.के.सैफुद्दीन, डी.एस.क्षीरसागर, एन.झेड.पाटील, के.जी.मिस्कीन, एन.वाय.गावंडे, एस.बी.जोशी मनपातील ही मंडळी रस्ते कामांशी निगडित आहे.
४नवीन रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेची देखरेख, स्थळपाहणी अहवाल, गुणवत्ता अहवाल, पॅचवर्कची तांत्रिक देखभाल करून कंत्राटदारांचे बिल देण्याची शिफारस याच यंत्रणेच्या हाती असते. कनिष्ठ अभियंत्यावर ८० टक्के, उपअभियंत्यावर १० टक्के, कार्यकारी अभियंत्यावर ५ टक्के व शहर अभियंत्यावर ५ टक्के जबाबदारी असते. १
१ एप्रिल २०११ ते मार्च २०१३ पर्यंत सुमारे ५ कोटी रुपये पॅचवर्कवर खर्च केले. एवढ्या रकमेत दोन किलोमीटर रस्त्याचे पुन:डांबरीकरण झाले असते; मात्र पालिकेने खड्ड्यात एवढी रक्कम घालूनही रस्ते खड्ड्यात आहेत.
२पॅचवर्कमधील कामांच्या घोटाळ्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने तांत्रिक पद्धतीने काम न झाल्यामुळे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेल्याचा निष्कर्ष काढला होता. तो घोटाळा दडपण्यात आला आहे. ३
५ ते ६ कोटी रुपयांचा घोटाळा पॅचवर्कमध्ये झाला होता. ७ जुलै २०१३ रोजी मुख्य लेखापरीक्षक मो.रा.थत्ते, उपअभियंता काजी मोईनोद्दीन, माजी सभापती तथा नगरसेवक जगदीश सिद्ध यांची समिती पॅचवर्कच्या कामांचे मूल्यांकन करण्यासाठी गठित करण्यात आली होती. ४
समितीचे अध्यक्ष मो.रा.थत्ते यांनी संबंधित विभागाकडे कंत्राटदारांच्या कामांच्या संचिका मागवण्यासाठी पत्रव्यवहार केला; मात्र त्यांना मेजरबुक व इतर माहिती आजपर्यंत सापडलेली नाही.