जनता मार्केटच्या तळमजल्यातील व्यापाऱ्यांचे मनपाला साकडे
By Admin | Updated: July 4, 2014 00:19 IST2014-07-04T00:01:12+5:302014-07-04T00:19:17+5:30
नांदेड : जनता मार्केटच्या इमारतीचा पहिला मजला धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला

जनता मार्केटच्या तळमजल्यातील व्यापाऱ्यांचे मनपाला साकडे
नांदेड : जनता मार्केटच्या इमारतीचा पहिला मजला धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला असला तरी तळमजला मात्र डागडुजी करून पाच वर्षे टिकू शकतो असेही अभियांत्रिकी अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे़ त्यामुळे तळमजल्यातील व्यापाऱ्यांना १५ दिवसांत गाळे रिकामे करा म्हणणे अन्यायकारक ठरेल, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे़
जनता मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील गाळेधारकांना सात दिवसांत गाळे रिकामे करण्याच्या सूचना मनपाने नोटीशीद्वारे दिल्या आहेत़ तसेच तळमजल्यातील गाळेधारकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे़ दरम्यान, या संदर्भात भाडेकरू व्यापारी असोसिएशनने मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली आहे़ त्यांनीही व्यापाऱ्यांचे मुद्दे सहानुभूतीपूर्वक समजून घेतले आहे़ त्यामुळे व्यापाऱ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालातील तळमजल्याविषयीच्या टिपणीचा हवाला देत गाळे रिकामे करण्याच्या नोटीशीचा पुनर्विचार करावा, अशी विनंती केली आहे़
तसेच पहिल्या मजल्यावरील गाळे धारक स्थलांतरीत केल्या जाणाऱ्या योग्य जागेबाबत तसेच भविष्यात नव्या इमारतीत मिळणाऱ्या जागेबाबत मनपाशी चर्चा करीत आहे़ या सर्व विषयाचा लेखी लेखाजोखा दोन्ही पातळीवर होवून सुस्पष्ट करार व्हावेत, अशी भूमिकाही मांडली जात आहे़ परंतु तळमजल्यावर लाखो रुपयांचे मोठे व्यावसायिक व व्यापारी आहेत़ त्यांचा उदरनिर्वाह, व्यवसाय हा मुख्य रस्त्यावरील गाळ्यांवरच आधारित आहे़ त्यामुळे तळमजल्यातील व्यापारी पाच वर्षे तळमजला टिकू शकतो, तर मग सर्वांनाच गाळे खाली करण्याची सक्ती कशासाठी असा प्रश्न उपस्थित करीत आहे़ चर्चा करून तळमजल्यावरील व्यापाऱ्यांना अधिकचा वेळ दिला तर त्यांचे मोठे नुकसान टळणार आहे़ शिवाय पहिल्या मजल्यावरील एक व्यावसायिकानेही आपण खाजगी परंतु अधिकृत बांधकाम तज्ज्ञाशी सल्लामसलत करू अशी प्रतिक्रिया दिली़ त्यांनी सांगितले, सिमेंट काँक्रीटच्या इमारतीचे आयुष्य साधारणपणे ५० ते ६० वर्षे असते़ परंतु ३०-३५ वर्षात ही इमारत धोकादायक झाली, याबद्दल शासकीय यंत्रणेचा अहवाल तूर्त मान्य करणे हाच आमच्यासमोर पर्याय आहे़ परंतु वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे व त्या अनुषंगाने महापालिकेनेही न्यायाच्या भूमिकेने याकडे पहावे, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)