पाच कर्मचाऱ्यांवरच ‘अन्न, औषध’चा कारभार
By Admin | Updated: July 4, 2016 00:31 IST2016-07-03T23:52:01+5:302016-07-04T00:31:02+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सर्वसामान्यांच्या आरोग्यासंबंधीची अनेक महत्त्वपूर्ण कामांची जबाबदारी असते. प्रत्येक तालुक्यात कार्यालयात असावे,

पाच कर्मचाऱ्यांवरच ‘अन्न, औषध’चा कारभार
शिरीष शिंदे , बीड
अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सर्वसामान्यांच्या आरोग्यासंबंधीची अनेक महत्त्वपूर्ण कामांची जबाबदारी असते. प्रत्येक तालुक्यात कार्यालयात असावे, अशी परिस्थिती असतानाही जिल्ह्याच्या ठिकाणी एकमेव कार्यालय आहे. त्यातही १५ मंजूर पदांपैकी केवळ पाच कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कारभार ढेपाळला आहे.
येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात १५ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये सहायक आयुक्त २, इन्स्पेक्टर २, आर.एस. ३, क्लर्क ४, वर्ग-४ चे ४ कर्मचारी असे एकूण १५ पदे मंजूर आहेत. यापैकी सद्य: परिस्थितीत हेडक्लर्क पी.पी. पेठे, वरिष्ठ लिपिक एस.आर. खोसे, नमुना सहायक एस.एल. टापरे, शिपाई शेख व शेंडगे या पाच कर्मचाऱ्यांवरच कार्यालयाची मदार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांची नाशिक येथे नुकतीच बदली झाली आहे.
बीड येथील सहायक आयुक्त (अन्न) या पदाचा अतिरिक्त पदभार परभणी येथील के.आर. जयपूरकर यांच्याकडे आहे, तर जालना येथील सुरक्षा अधिकारी आर.एम. भरकड यांच्याकडे बीडचा चार्ज आहे.
सहायक आयुक्त (औषध) चा चार्ज जालना येथील डी.के. जगताप यांच्याकडे आहे, तर औषध निरीक्षक डी.आर. मालपुरे महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. यामुळे दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहेत.
अन्न व औषध हे दोन वेगवेगळे विभाग सदर कार्यालयात आहेत. अन्न विभागाकडे दुकानासाठी लागणारे परवाने, हॉटेल, धाबा यांना दिले जाणारे परवाने, तसेच अन्नामधील भेसळीची वेळोवेळी तपासणी, गुटखाचालकांवर कारवाई यासह ज्यांनी अन्न सुरक्षेसंबंधी नियमभंग केला आहे, अशी प्रकरणे वकिलांमार्फत न्यायालयात चालविणे अशा महत्त्वपूर्ण कामांची जबाबदारी येते, तर औषधी विभागात मेडिकल दुकानांना परवानगी देणे, दुकानांची नियमित तपासणी करणे, एमटीपी किट व इतर महत्त्वपूर्ण गोळ्या औषधी संबंधी माहिती ठेवणे, न्यायालयात प्रकरणे वकिलांमार्फत चालविणे अशी महत्त्वपूर्ण कामे केली जातात.