१२ पथकांची निगराणी
By Admin | Updated: May 8, 2016 23:51 IST2016-05-08T23:10:52+5:302016-05-08T23:51:52+5:30
राजेश खराडे , बीड खरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे.

१२ पथकांची निगराणी
राजेश खराडे , बीड
खरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे. त्या प्रमाणात मागणीही करून खत, बियाणांचा पुरवठा होण्यास सुरवात झाली आहे. खरेदी-विक्रीत अनियमितता होऊ नये म्हणून जिल्ह्यात १२ पथके नेमण्यात आली आहेत.
खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र लक्षात घेता १ लाख ४६ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे, पैकी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. बियाणांच्या ७० हजार क्विंटलच्या मागणीनुसार कृषी विभागाकडे सोयाबीनचे १५ हजार क्विंटल खत उपलब्ध झाले आहे. गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांकडून मानवनिर्मित टंचाई दर्शविण्यात आली होती.
यंदा अगोदरच शेतकरी दुष्काळात होरपळलेला आहे अशातच खते, बियाणांच्या पुरवठ्यात अनियमितता होऊ नये म्हणून जिल्हा पथकासह तालुकानिहाय एक पथक नेमण्यात आले आहे. पथकाकडून बियाणांची खरेदी, पावती, विक्रीच्या रजिस्टरला नोंदी, दुकानासमोर दरफलक, तसेच उपलब्ध खत, बियाणांचा साठा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे २०० पेक्षा अधिक खत, बियाणे विक्रेते आहेत. गतवर्षी विक्रीमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने अंबाजोगाई येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर तिघा जणांचा परवाना जप्त करून आठ जणांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पथकाने केली होती. पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण बियाणांची विक्री झाली नव्हती, त्यामुळे गतवर्षीचे बियाणे व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. त्याचीच विक्री यंदाही होऊ नये याचे मोठे आव्हान पथकासमोर राहणार आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्याकडे त्या तालुक्याची जबाबदारी असून, यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय पथक नेमण्यात आले आहे. सद्य:स्थितीला खत, बियाणे विक्रीला सुरुवात झाली नसली तरी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, सोयाबीनचे १५ हजार, उडदाचे एक हजार क्विंटल, तर कापसाच्या २ लाख ५० पाकिटांचा साठा कृषी विभागाकडे आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोन्हीही मुख्य हंगामातील पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान होत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी खरिपाबाबत जिल्हा कृषी विभाग तत्पर झाला आहे. बळीराजाही मशागतीच्या कामाला लागला आहे.
प्रशासन दरबारी २०० खत, बियाणे विक्रेत्यांची नोंद असली तरी आता ग्रामीण भागातही अनाधिकृतपणे विके्रत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याचे मोठे आव्हान आहे.
४तालुक्याचे पथकप्रमुख तालुका कृषी अधिकारी राहणार असून, ३५ अधिकाऱ्यांद्वारे खत, बी-बियाणांच्या विक्रीमध्ये होणारी अनियमितता आटोक्यात आणली जाणार आहे.\
तक्रार समोर येताच दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी सर्व बाबींचे रेकॉर्ड बाळगणे अनिवार्य राहणार आहे. ज्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत, त्यांच्याकडून खत, बियाणांचा विक्री होणे गरजेचे आहे.
- डी. बी. बिटके, पथक प्रमुख
सर्वाधिक बियाणे सोयाबीनचे
जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत असले तरी यामधून शेतकऱ्याचे अधिकचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे यंदा कापसावर भर न देता सोयाबीनच्या लागवडीविषयी कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचाही ओढा सोयाबीन व कडधान्यावरच आहे. त्यामुळे ७० हजार क्विंटलच्या बियाणे मागणीमध्ये सोयाबीन ५० हजार क्विंटल आहे. त्यापैकी १५ हजार क्विंटलचा पुरवठा झाला असून, शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध आहे.