छत्रपती संभाजीनगर : वर्षभरापूर्वी आईने दुसरे लग्न केलेल्या सावत्र बापानेच दहा वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. मुलीस रक्तस्राव होऊन बेशुद्ध पडल्यानंतर आईने तिला घटनेची वाच्यता न करण्यासाठी धमकावले. त्यानंतरही वडिलांनी दोन वेळेस अत्याचाराचा प्रयत्न केल्याने मुलीने घरातून पळ काढत गुरुवारी शहर गाठत परिचयातील मावशीकडे धाव घेतल्यानंतर शुक्रवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
काही वर्षांपूर्वी शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या १० वर्षीय राणीच्या (नाव बदलले आहे) वडिलांचे निधन झाल्याने आईने बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथील एका शेतकऱ्यासोबत दुसरे लग्न केले. पंधरा दिवसांपूर्वी सावत्र पित्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला. त्यानंतरही दोन वेळेस अश्लील कृत्य केले. यामुळे राणी तणावाखाली जाऊन आजारी पडली. गुरुवारी दुपारी तिने घर सोडले. बसने ती शहरात सिडको बस स्थानकावर उतरली. तेथे रडत असताना हनुमाननगरच्या एका तरुणाने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने शिवाजीनगरमधील परिचयातील मावशी सुषमा रावल-पाटील यांचा मोबाइल क्रमांक सांगितला. तरुणाने सुषमा यांच्याशी संपर्क साधला. ओळख पटल्यानंतर तरुणाने राणीला सुषमा यांच्या घरी सोडले.
पप्पांना अटक होईल, कोणाला सांगू नकोपहिल्या अत्याचारानंतर राणी रक्तस्राव होऊन बेशुद्ध पडली. आईने मात्र तिला कोणाला सांगू नकोस, असे बजावले. त्यानंतरही बापाने तिच्यासोबत दोनदा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करत घरात कोंडले. गळ्याला चटके दिल्याचेही राणीने पोलिस आयुक्तालयात सांगितले.
पैशांचा गल्ला फोडला अन् घर सोडलेछळ असह्य झाल्याने राणीने गुरुवारी दुपारी तिचा पैशांचा गल्ला फोडून तिकिटासाठी पैसे घेतले. रात्री उशिरा तापाने फणफणलेल्या राणीला विश्वासात घेतल्यानंतर तिने सुषमा यांच्याकडे आपबिती कथन केली. ही बाब कळताच शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, राजेश जंगले, शिल्पाराणी वाडकर यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. पवार यांनी तत्काळ पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शुक्रवारी रात्री भराेसा सेलच्या सहायक निरीक्षक उज्ज्वला देशमुख, उपनिरीक्षक ज्योती गात, अंमलदार प्रदीप पवार, विक्रम म्हस्के यांनी तिचा जबाब नोंदवला. प्रकृती खराब असल्याने व रडणे थांबत नसल्याने पोलिसांनी सुषमा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.