मल्लांची शिष्यवृत्ती रखडली
By Admin | Updated: March 6, 2017 00:48 IST2017-03-06T00:47:50+5:302017-03-06T00:48:43+5:30
लातूर : जीवाचे रान करीत मेहनत करणाऱ्या मल्लांनी राज्याचे नावलौकिक करावे, अशी अपेक्षा ठेवून शासनाने त्यांना क्रीडा धोरणात शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले.

मल्लांची शिष्यवृत्ती रखडली
लातूर : जीवाचे रान करीत मेहनत करणाऱ्या मल्लांनी राज्याचे नावलौकिक करावे, अशी अपेक्षा ठेवून शासनाने त्यांना क्रीडा धोरणात शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले. मात्र लातूर ुजिल्ह्यातील ५४ मल्लांची शिष्यवृत्ती क्रीडा विभागाच्या उदासीनतेमुळे रखडली आहे. २०१३-१४ मधील २५, २०१४-१५ मधील १६ आणि २०१५-१६ मधील १३ मल्लांची शिष्यवृत्ती रखडली आहे. क्रीडा कार्यालयात खेटे मारून मल्लांची निराशा होत आहे.
२०१३-१४ मधील २५ मल्लांची ५० ते ६० हजार, २०१४-१५ मधील १६ मल्लांची ३५ हजार आणि २०१५-१६ मधील १३ मल्लांची २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती रखडली आहे. मल्लांकडून संबंधित कार्यालयाकडे वारंवार शिष्यवृत्तीसाठी मागणी होत आहे. मात्र शासनाकडून शिष्यवृत्ती अद्याप आली नसल्याचे कारण त्यांना सांगितले जात आहे.
राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून त्यांच्या पदकांनुसार अनुक्रमे शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. लातूर जिल्ह्याचा इतिहास पाहता राज्य व देशभरात लातूरच्या मल्लांनी कुस्तीमध्ये छाप सोडली आहे. लातूरच्या अनेक मल्लांनी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. मात्र शासनामार्फत मिळणारी शिष्यवृत्ती त्यांना वेळेवर मिळत नाही. लातूर व पुण्याच्या कार्यालयात अनेकवेळा खेटे मारूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. लातूरचे क्रीडा कार्यालयही याबाबत गांभीर्याने पाहत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच अवस्था झाल्याने ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर खेळाडूंना मानधन देण्यात आले. आता आणखी तोच प्रश्न कुस्तीगीरांसमोर निर्माण झाला आहे. यासह वयोवृद्ध खेळाडूंचेही मानधन रखडले होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते देण्यात आले. परंतु, कुस्तीपटूंचे मानधन अद्यापि दिले नसल्याने कुस्तीगीरांतून नाराजीचा सूर उमटत आहे. वर्षभर सकाळ-सायंकाळ मेहनत करून मल्ल आपल्या कौशल्याची ताकद वाढवितात. त्यामुळेच त्यांंना स्पर्धेत यश मिळते. मात्र प्रशासनाकडून त्यांची वेळेत दखल घेतली जात नाही.
लातूरच्या क्रीडा कार्यालयात अनेक कुस्तीपटूंनी खेटे मारले. त्यांना बँकेचा खाते क्रमांक चुकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मल्लांकडून दुरुस्ती करूनही ते वेळेत मिळाले नाही. चौकशी करूनही त्यांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे इकडून-तिकडे चकरा मारूनही मल्लांच्या पदरी निराशाच आहे. (प्रतिनिधी)