तुळजापुरातही ‘माळीण’..?
By Admin | Updated: September 15, 2014 00:26 IST2014-09-15T00:19:51+5:302014-09-15T00:26:38+5:30
विजय मुंडे, उस्मानाबाद तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील घाटशीळ परिसरातील दरड कोसळल्याने दोन घरांचे नुकसान झाले होते़

तुळजापुरातही ‘माळीण’..?
विजय मुंडे, उस्मानाबाद
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील घाटशीळ परिसरातील दरड कोसळल्याने दोन घरांचे नुकसान झाले होते़ गणेशोत्सव कालावधीतील ही घटना तुळजापूर शहरवासियांसाठी धक्कादायक होती़ शहराच्या परिसरात डोंगराच्या कडेला शेकडो घरे असून, इथे भविष्यात दरडी कोसळून भीषण घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ या धोकादायक परिस्थितीतील घरांकडे प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केले आहे़
बालाघाटाच्या डोंगररांगेत वसलेल्या शहरापैकी एक तुळजापूर शहर आहे़ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या या भूमीत डोंगराच्या कडेला राहणाऱ्या शेकडो कुटुंबातील नागरिकांच्या जीवावर टांगती तलवार कायम आहे़ काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव कालावधित घाटशीळ परिसरातील दरड कोसळल्याने दोन घरांचे नुकसान झाले होते़ सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही़ या घटनेने तुळजापूर शहरालाच नव्हे तर अवघ्या जिल्ह्याला माळीण गावची घटना आठवून गेली़ तुळजापुरातील अनेक घरे आजही डोंगराच्या कडेला आहेत़ सोलापूर बायपास मार्गावरून जाताना ही अवस्था प्रकर्षाने दिसून येते़ जिजामाता झोपडपट्टी, आराधवाडी, वेताळनगर, पापनाश झोपडपट्टी, दयावान नगर, घाटशीळ रोड आदी परिसरातील परिस्थिती भीषण आहे़ गत अनेक वर्षांपासून ही कुटुंबे येथे राहतात़ आज ही घरे सुस्थितीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, भविष्यातील मोठे किंवा मुर पावसामुळे या घरांना धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही़
पुनर्वसनाची गरज
तुळजापूर शहरातील शेकडो कुटुंबे आजही डोंगराच्या कडेला राहतात़ पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे़ मोठ्या पावसात भविष्यात या घरांना धोका उद्भवू शकतो़ त्यामुळे भविष्यातील दूर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने या कुटुंबांना इतरत्र राहण्याच्या सूचना देण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे़ (प्रतिनिधी)
घरप्रमुखांना नोटीसा बजावल्या
घाटशीळ परिसरात दरड कोसळून दोन घरांचे नुकसान झाले आहे़ भविष्यातील भीती पाहता या परिसरातील आठ ते पंधरा घरप्रमुखांना नोटीसा बजावल्या असून, त्यांना इतरत्र राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत़ शिवाय शहरातील इतर भागांचाही सर्वे करण्यात येणार असून, त्याबाबत पालिका प्रशासन लवकरच योग्य ती कारवाई करेल, अशी माहिती तुळजापूर पालिकेचे मुख्याधिकारी आऱएस़बुबणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़