माळेगाव मग्रारोहयोच्या कामात घोटाळा?
By Admin | Updated: December 15, 2015 23:53 IST2015-12-15T23:48:07+5:302015-12-15T23:53:37+5:30
लोहा : तालुक्यातील माळेगाव (यात्रा) येथील रोहयो कामात भ्रष्टाचार झाला

माळेगाव मग्रारोहयोच्या कामात घोटाळा?
लोहा : तालुक्यातील माळेगाव (यात्रा) येथील रोहयो कामात भ्रष्टाचार झाला असून खऱ्या लाभार्थी मजुरांना मजुरीचे वाटप करण्यात आले नसल्यामुळे संतप्त दीडशे मजुरांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तहसीलदारांच्या दालनात तासभर घेराव घातल्याची घटना १४ रोजी दुपारी घडली़
तीर्थक्षेत्र असलेल्या माळेगाव (यात्रा) येथील रोहयोअंतर्गत विविध कामे करण्यात आली़ मात्र संबंधितांनी मिलीभगत करून ई-मस्टरमध्ये खोटे नावे समाविष्ट करून खऱ्या मजुरांना बाजुला ठेवले़ तसेच खोट्या लाभार्थ्यांच्या नावे असलेली मजुरी पोस्टामार्फत उचलून हडप केली व लाभार्थ्यांना मजुरीपासून वंचित ठेवले़ मजुरांची मजुरी तत्काळ वाटप करण्यात यावी व भ्रष्टाचारी कृषी सहाय्यक व रोजगार सेवकास तत्काळ निलंबित करावे या मागणीसाठी भाऊसाहेब वाघमारे, हनुमंत धुळगंडे, पंढरी कांबळे, प्रदीप जवळगेकर, संतराम वाघमारे आदींच्या नेतृत्वाखाली माळेगाव येथील दीडशे महिला, पुरुष मजुरांनी तहसीलदारांच्या दालनात तहसीलदार झंपरवाड व तालुका कृषी अधिकारी विश्वंभर मंगनाळे यांना तासभर घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला़
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद पवार, काँग्रेसचे शेख अहमद यांच्या मध्यस्थीने व तहसीलदारांनी मागण्या तत्काळ पूर्ण करण्याचे तसेच संपूर्ण कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिलयाने आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली़ यावेळी हनमंत देमगुंडे, शंकर जोंधळे, केरूजी हिवरे, शांताबाई साळवे, केराबाई कांबळे, अप्पराव धुळगंडे, बळी हिवरे, धोंडीबा कांबळे, आशाबाई वाघमारे, छबुबाई गंडाळे, तुळसाबाई वाघमारे, निलुबाई वाघमारेसह जवळपास दीडशे मजुरांची उपस्थिती होती़
(वार्ताहर)