पैठणला उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST2021-06-11T04:04:52+5:302021-06-11T04:04:52+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र बिडकीन येथे हलविण्यात येणार आहे. ...

पैठणला उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) पैठण येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र बिडकीन येथे हलविण्यात येणार आहे. तर पैठणमधील केंद्राच्या जागी आता ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय केले जाणार आहे. त्यासोबतच येथे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीत पैठण येथील घाटीचे केंद्र बिडकीनला हलविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. इंटर्न डाॅक्टरांच्या एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र हे ३० कि.मी. अंतरात असणे गरजेचे आहे; परंतु पैठण येथील केंद्र जवळपास ५४ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे घाटीतील पाहणीप्रसंगी २०१४ मध्ये ‘एमसीआय‘ने यासंदर्भात त्रुटी काढली होती. आता अखेर हे केंद्र बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत केले जाणार आहे. यामुळे ‘एमसीआय‘ने काढलेली त्रुटी दूर होईल, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले. घाटीचे प्रशिक्षण केंद्र बिडकीनला होणार असल्याने येथील आरोग्य सुविधाही बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.