लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर वेगळी व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:05 IST2021-04-09T04:05:41+5:302021-04-09T04:05:41+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तसेच बी.ए, बीएस्सी व बी.कॉम या पारंपरिक ...

लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर वेगळी व्यवस्था करा
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तसेच बी.ए, बीएस्सी व बी.कॉम या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होण्याअगोदर सर्व परीक्षा केंद्रांना ‘कोविड’संदर्भात काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली, तर त्याची आसन व्यवस्था वेगळी करण्याचेही सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले की, सात एप्रिलपासून बी.ए., बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्याअगोदर १६ मार्चपासून पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा, तर ६ एप्रिलपासून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या परीक्षा सुरू होण्यापूर्वी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कोविडच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ऑफलाईन परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्ये होम सेंटर देण्यात आले आहे. दरम्यान, काल पैठण येथे कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची वेगळी व्यवस्था न करता, पीपीई कीट घालतलेले नसताना त्याने सर्वांबरोबर परीक्षा दिल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये वाचण्यात आली. अद्यापपर्यंत यासंबंधीची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झालेली नाही. तरीही त्याबाबतचे तथ्यशोधन केले जाईल.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी १४ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर ७ एप्रिल रोजी सुरू झालेल्या बी.ए., बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाच्या परीक्षेस एकूण ७६ हजार ४९० विद्यार्थी आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होऊन तीन आठवड्यांचा कालावधी लोटला असून, या काळात विविध अभ्यासक्रमांचे २ लाख १८ हजार ६२० विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा देत आहेत. बुधवारी १ लाख २५ हजार ७३० जणांनी ऑफलाईन पद्धतीने २५० केंद्रावर परीक्षा दिली, तर ४४ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली. या दोन दिवसांत एकूण ३ लाख ६ हजार ९३४ जणांनी परीक्षा दिली आहे.