मराठीतील पदार्पणासाठी मातीतील चित्रपट करायचा होता
By Admin | Updated: August 22, 2016 01:11 IST2016-08-22T00:53:14+5:302016-08-22T01:11:28+5:30
गजेंद्र देशमुख , जालना हिंदी चित्रपटासाठी भरपूर काम केले. मात्र मराठी चित्रपट करताना मातीतलाच चित्रपट करण्याचे ठरविले होते. तशाच धाटणीचा अस्सल मातीतला,

मराठीतील पदार्पणासाठी मातीतील चित्रपट करायचा होता
गजेंद्र देशमुख , जालना
हिंदी चित्रपटासाठी भरपूर काम केले. मात्र मराठी चित्रपट करताना मातीतलाच चित्रपट करण्याचे ठरविले होते. तशाच धाटणीचा अस्सल मातीतला, एक परंपेरची जाणीव करून देणारा चित्रपट तयार झाला तो म्हणजे तालीम. चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडे व इतर कलाकारांनी चित्रपट आणि निर्मितीप्रसंगी आलेले अनुभव लोकमतशी संवाद साधताना उलगडले.
तालीम चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन रोकडे, अभिनेता अभिजित श्वेतचंद्र, अभिनेत्री वैशाली दाभाडे, विष्णू जोशीलकर, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ आदींची टीम जालना शहरात चित्रपटाच्या प्रमोजसाठी आलेली आहे. यानिमित्त संपूर्ण टिमशी संवाद साधून अनेक पैलंूवर प्रकाश टाकण्यात आला. तालीम हा कुस्ती आणि लावणी यांची चांगली गुंफण असलेला हा चित्रपट आहे. कुस्ती आणि लावणी शिकतानाही कशी तालीम करावी लागते, वास्तव कसे असते आणि परिस्थती कशी असते याचे हृदयस्पर्शी चित्र या चित्रपट मांडण्यात आल्याचे रोकडे यांनी सांगितले. दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी यापूर्वी पार्टनर, मै तेरा हिरो, देसी बॉईजसह अनेक हिंदी चित्रपटासाठी काम केले आहे. मूळचे पाचगणी येथील रहिवासी असलेले रोकडे यांना मातीतलाच चित्रपट करायचा होता आणि त्या अनुषंगाने ही कथा तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बाबतीत सजीवता येण्यासाठी व कुस्तीचे वेगळे फिल येण्यासाठी परिश्रम घेतल्याचे रोकडे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कुस्तीचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. अनेक मल्लांशी संवाद विविध पुस्तकांचा आधार घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुणे, भोर, कुुंडलगाव, नाणेघाटात याचे शुटिंग करण्यात आलेले आहे. मातीतला खेळ टिकावा ही माझी भावना असल्याने हा चित्रपट तयार झाला. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक बाजचा वापर केला. कलाकारांनी भूमिकेला न्याय देऊन छाप पाडण्याचा प्रयत्न केला. बहुतांश शुटिंग लाल मातीत झाल्याने कलाकारांनीही कधी नाराजी व्यक्त केली नसल्याचे सांगून शुटिंग दरम्यान आलेले अनुभव सांगितले. चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणारी वैशाली दाभाडे ही मूळची जालन्याची आहे. कुस्ती आणि लावणीवर आधारित एक उत्कृष्ट असा सिनेमा असल्याचे वैशालीने सांगितले. यामुळे जालनेकरांनाही या चित्रपटाचे आकर्षण आहे. जिल्ह्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून जोरदार स्वागत होत असल्याचे वैशालीने सांगितले. लावणी सादर करताना येणाऱ्या अडचणी, समाज कशा पद्धतीने लावणी सादर करणाऱ्या महिलांकडे पाहतो आणि लावणी आणि कुस्ती यांचा सुरेख संगम येथे पाहावयास मिळतो. दोन्हीही कलांसाठी ताकदीचा व तालीम केल्याशिवाय यश मिळत नाहीत अशा आहेत.