फ्लॅट खरेदी करण्यासाठी नोकराने केला लुटीचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 19:14 IST2017-09-16T19:14:22+5:302017-09-16T19:14:58+5:30
रिक्षाप्रवासादरम्यान दोन जणांनी ३ लाख १० हजार रुपये किंमतीची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची बॅग हिसकावून नेल्याचा बनाव करणा-या नोकराला गुन्हेशाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली.

फ्लॅट खरेदी करण्यासाठी नोकराने केला लुटीचा बनाव
औरंगाबाद, दि. १६ : रिक्षाप्रवासादरम्यान दोन जणांनी ३ लाख १० हजार रुपये किंमतीची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेची बॅग हिसकावून नेल्याचा बनाव करणा-या नोकराला गुन्हेशाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली. फ्लॅट खरेदी करण्यासाठी हा बनाव केल्याची कबुली देत चोरलेला ऐवज पोलिसांना काढून दिला. गणेश नामदेव शेळके असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, दिवाण देवडी येथील जिगणेश भरतकुमार चंद्रनीस या व्यापा-याचे स्वामीनारायण गोल्ड पॅलेस हे दुकान आहे. यादुकानावर आरोपी हा नोकर म्हणून काम करायचा. शहरातील ज्वेलर्संना माल पुरवणे आणि त्यांच्याकडून पैसे आणण्याची जबाबदारी आरोपीवर होती. १५ सप्टेंबर रोजी त्याने सुमारे २ लाख ७०हजार रुपये किंमतीचे ९० ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार रुपयांचा ऐवज आणण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले. हा ऐवज हातात पडल्यानंतर त्याने तो हाडपण्याचा डाव रचला. आणि थेट स्वत:च्या घरात नेऊन ठेवला.
यानंतर तो मालकाच्या दुकानावर गेला आणि तेथे रडू लागला. सिडको बसस्थानक येथून मध्यवर्ती बसस्थानकाकडे रिक्षातून जात असताना सहप्रवाशी म्हणून बसलेल्या दोन जणांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक मेची बॅग हिसकावून नेली. यावेळी त्याला जीवे मारण्याची धमकी देत रिक्षातून उतरून दिल्याचे त्याने मालकाला सांगितले. त्याची ही कहाणी ऐकल्यानंतर अशाप्रकारे लुटमारीच्या घटना शहरात होतच असतात. यामुळे त्यांनी याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे ठरविले. या घटनेची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना मिळाली.
पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ.दिपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात,पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक अनिल वाघ, कर्मचारी नितीन मोरे, मनोज चव्हाण, भगवान शिलोटे, शेख हकीम,संजय खोसरे, संतोष सुर्यवंशी,अयुब पठाण, भाऊसिंग चव्हाण आणि फुंदे यांनी नोकर शेळके यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवून त्याची विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने काही दिवसापूर्वी फ्लॅट आणि प्लॉट पाहिला होता. फ्लॅट खरेदीसाठी त्याने लुटीचा बनाव केल्याची कबुली देत चोरलेला ऐवज काढून दिला.