भूमिगतच्या कामांची सखोल चौकशी करा

By Admin | Updated: June 13, 2017 01:05 IST2017-06-13T01:04:24+5:302017-06-13T01:05:16+5:30

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता आहे.

Make a deeper inquiry into the underground work | भूमिगतच्या कामांची सखोल चौकशी करा

भूमिगतच्या कामांची सखोल चौकशी करा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता आहे. या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण राज्य आणि केंद्र शासनाकडे करणार असल्याचे खा. चंद्रकांत खैरे यांनी जाहीर केले. सोमवारी सकाळी त्यांनी शहरातील विविध भागांत जाऊन भूमिगत गटार योजनेच्या संपूर्ण कामांची पाहणी केली.
कांचनवाडी येथील एसटीपी प्लांटचे काम वगळता भूमिगत गटार योजनेची सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडे आपण चौकशीची मागणी करणार असल्याचे केंद्राच्या नगर विकास मंत्रालयाचे दक्षता व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
रोजाबाग येथून त्यांनी कामाच्या पाहणीस सुरुवात केली. तेथून बजरंग चौक, दशमेशनगर, गजानननगर, पुंडलिकनगर, मयूरबन कॉलनी, वेदांतनगर, बन्सीलालनगरमार्गे कांचनवाडी येथील कामांची पाहणी केली. नाल्यातील ड्रेनेज लाइन, मेन होल्स (चेंबर्स), मुख्य ड्रेनेज लाइनला जोडणाऱ्या अपुऱ्या ड्रेनेज लाइनची पाहणी त्यांनी केली. यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, गटनेते मकरंद कुलकर्णी, नगरसेवक राजू वैद्य, विकास जैन, सिद्धांत शिरसाट, आयुक्त डी. एम. मुगळीकर, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, कंत्राटदाराचे प्रतिनिधी घोसाल, साजीद, तसेच पीएमसीचे समीर जोशी उपस्थित होते.
सर्वत्र भोंगळ कारभार
मुख्य ड्रेनेज लाइनचे पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. कुठे छोटे, तर कुठे मोठे पाईप वापरण्यात आल्याने जोडण्याचे काम अतिशय अशक्यप्राय आहे. ड्रेनेज लाइन उंचीवर, तर काही भागांत अत्यंत खोल टाकण्यात आल्या आहेत. चेंबर्स आणि मेनहोल नाल्यातून वाहून येणाऱ्या कचऱ्यामुळे तुडुंब भरलेले आहेत. कुठेही मुख्य ड्रेनेज लाइनला ड्रेनेज लाइन जोडलेल्या नाहीत. जिथे ड्रेनेज लाइन टाकल्या आहेत त्या नाल्यांमधून आजही घाण पाणी वाहत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने ड्रेनेज लाइन कशासाठी टाकल्या आहेत, हे पाहणीनंतर दिसून आले.

Web Title: Make a deeper inquiry into the underground work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.