विवेकी समाज उभारणीसाठी बांधिलकी कृतिशील करावी
By Admin | Updated: August 21, 2014 00:12 IST2014-08-20T23:59:45+5:302014-08-21T00:12:13+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभिवादन फेरी काढण्यात आली.

विवेकी समाज उभारणीसाठी बांधिलकी कृतिशील करावी
औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनीदेखील त्यांच्या खुनाच्या तपासाचा पाठपुरावा करावा लागत आहे. त्यामुळे आपला संताप, आपली वेदना आणि दु:ख व्यक्त करत महाराष्ट्रासह देशाला आणि जगाला विवेकी विचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. विवेकी समाज उभारणीसाठी आपली तन, मन, धनाची बांधिलकी कृतिशील करणे हीच खरी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली ठरेल, अशी भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून अभिवादन फेरी काढण्यात आली. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फेरी सरस्वती भुवन परिसरात आली. या ठिकाणी घेण्यात आलेल्या सभेत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक चंदाताई जरीवाला, ताराबाई लड्डा, स.भु. शिक्षण संस्थेचे प्रा. दिनकर बोरीकर, ज्ञानप्रकाश मोदाणी, ज्येष्ठ लेखक, नाटककार अजित दळवी, मंगल खिंवसरा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष डॉ. रश्मी बोरीकर, शहर कार्याध्यक्ष डॉ. क्षमा खोब्रागडे, राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, मोहन भोमे, लक्ष्मण महाजन, व्ही.सी. भुयागळे, बुद्धप्रिय कबीर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
अभिवादन फेरीत समविचारी पुरोगामी परिवर्तनवादी संघटना, संस्थांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे छायाचित्र तसेच विविध वाक्ये लिहिलेले फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते. ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’, ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’, अशा घोषणा देण्यात आल्या.