जिल्हा शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदल
By Admin | Updated: November 5, 2014 00:57 IST2014-11-05T00:34:52+5:302014-11-05T00:57:52+5:30
उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळालेली असल्याने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आजही शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे.

जिल्हा शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदल
उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळालेली असल्याने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आजही शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. मात्र जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीची दिशाभूल केल्याने शिवसेनेला मोठे नुकसान सोसावे लागल्याचे सांगत, येत्या काही दिवसात जिल्हा शिवसेनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांनी दिले. जुन्या निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्षाची पूणर्बांधणी करण्यात येणार असल्याचेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा पाया भक्कम आहे. त्यामुळे सत्तेत असो किंवा नसो पक्षावर फारसा परिणाम पडणार नाही. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असून, गाव पातळीपासून शिवसेना भक्कम करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे खोचरे यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून शिवसेनेला मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा होती.
उस्मानाबाद कळंबसह परंडा, औसा, बार्शी या मतदारसंघात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा आहे. विधानसभेच्या तिकिट वाटपावेळी काही उमेदवारांनी ‘तुम्ही फक्त तिकिट द्या, आम्ही मोठ्या फरकाने जागा आणून दाखवितो’ असे सांगितले. काही मतदारसंघात नकारात्मक स्थिती असल्याचे अहवाल पक्षश्रेष्ठींकडे त्यावेळीच प्राप्त झाले होते. मात्र तरीही उमेदवार तसेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेऊन पक्षश्रेष्ठींनी तिकिटे दिली. मात्र हक्काच्या जागेवरच पक्षाला फटका बसल्याचे खोचरे म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसह जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने काँग्रेससोबत जावे, असा आग्रह सेनेतील काहींनी धरला होता. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि त्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष वाढेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र ही युतीच पराभवाचे प्रमुख कारण ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तेचा तळा-गाळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लाभ देण्याची गरज होती. मात्र घडले ते उलटच त्यामुळे पक्षाचा पाया असलेला शिवसैनिक या सत्तेमध्ये कोठेही नसल्याने गोंधळून गेला, निराश झाला. त्याचेच परिणाम विधानसभा निवडणुकीत सोसावे लागल्याचे सांगत, विधानसभा निवडणुकीतील अपयश हे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे नव्हे तर आम्हा पदाधिकाऱ्यांचे आहे, अशी कबूलीही खोचरे यांनी दिली. मागील निवडणूकीत राज्यातून अवघी एक जागा कमी आल्याने पक्षाचे विरोधीपक्ष नेतेपद गेले होते. यावेळी आम्ही जिल्ह्यातील काही हक्काच्या जागा गमावून पक्षाचे मोठे नुकसान केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना पक्षश्रेष्ठींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच सर्व प्रकारचे अधिकार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र त्यानंतरही पक्षाला जिल्ह्यातील हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या. विधानसभा निवडणुकीत पक्षाला सर्वाधिक म्हणजे २ लाख ३३ हजार ९२१ मते मिळाली आहेत. म्हणजेच जिल्ह्यात पक्षाचा जनाधार कायम आहे. काही चुकामुळे आम्ही मतदारसंघ गमावले आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच पक्षाच्या हितचिंतकांना शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आणून पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येईल. या निवडणूकीत आमचा विश्वासघात झाला. त्याची किंमत चुकवावी लागली असली तरी, त्यातून पक्षाला मोठा धडा मिळाला आहे. सत्ता येते आणि जाते, जनता दलाचीही देशात सत्ता आली आणि गेली, आज तो पक्ष कुठे आहे. त्यामुळे यापुढे कोणावर विसंबून न राहता केवळ शिवसेना म्हणूनच आम्ही सशक्तपणे पक्षाची बांधणी करु असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्यातील युतीचा तिढा सुटल्यानंतर जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी योग्य ती पावले उचलण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.