प्रमुख शासकीय कार्यालयेही थकबाकीदार

By Admin | Updated: February 12, 2015 00:54 IST2015-02-12T00:45:39+5:302015-02-12T00:54:49+5:30

संजय कुलकर्णी , जालना नगरपालिकेच्या पाणीपट्टी थकबाकीच्या यादीत शहरातील चार प्रमुख कार्यालये असून अन्य काही कार्यालयांसह त्यांच्याकडे दीड कोटींची थकबाकी आहे.

The major government offices are also outstanding | प्रमुख शासकीय कार्यालयेही थकबाकीदार

प्रमुख शासकीय कार्यालयेही थकबाकीदार


संजय कुलकर्णी , जालना
नगरपालिकेच्या पाणीपट्टी थकबाकीच्या यादीत शहरातील चार प्रमुख कार्यालये असून अन्य काही कार्यालयांसह त्यांच्याकडे दीड कोटींची थकबाकी आहे. एकीकडे सेवा देऊनही पालिकेला कराच्या माध्यमातून रक्कम मिळत नसल्याने पालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत कोलमडली आहे.
या प्रमुख चार कार्यालयांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३२ लाख, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे ३० लाख, जिल्हा परिषदेकडे १७ लाख तर रेल्वेस्थानकाकडे १० लाखांपेक्षा अधिक थकबाकी आहे. या कार्यालयांनाही नोटिसा बजावण्यात आल्या. परंतु अद्याप थकबाकीची रक्कम मिळाली नाही.
पालिकेने गेल्या दोन वर्षात एकूण ७० मालमत्तांवर थकित रक्कमेपोटी जप्तीची कार्यवाही केली. परंतु त्यातील ३५ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. अन्य ३५ जणांनी अद्यापही थकबाकीची रक्कम न भरल्याने त्यांच्या मालमत्तांवरील जप्ती कायम आहे. विशेष म्हणजे अनेक मालमत्तांची जप्ती झाली असली तरी संबंधितांनी कर भरलेला नाही. यासाठी पालिकेकडून वारंवार पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात आले. काही मालमत्ता कायमच्या जप्त करण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
पूर्वी पालिकेच्या सहा वसुली पथकांमार्फत वसुली आणि जप्ती अशा दोन्ही प्रकारची कामे केली जात होती. परंतु नगरपालिकेने आता वसुलीच्या पथकांपासून दोन पथके स्वतंत्र करून त्यांना केवळ जप्तीच्या कार्यवाहीचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे वसुली काही प्रमाणात वाढली असा दावा नगरपालिकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात वसुलीचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. (समाप्त)

Web Title: The major government offices are also outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.