माजलगावात डॉक्टरांच्या राजकारणामुळे रुग्ण त्रस्त
By Admin | Updated: June 11, 2017 00:41 IST2017-06-11T00:39:27+5:302017-06-11T00:41:13+5:30
माजलगाव : दोन दिवसांसाठी रूग्णालयाचा कारभार घेतला आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन वर्षे रूग्णालयाचे कारभारी बनून राहले

माजलगावात डॉक्टरांच्या राजकारणामुळे रुग्ण त्रस्त
पुरुषोत्तम करवा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : दोन दिवसांसाठी रूग्णालयाचा कारभार घेतला आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन वर्षे रूग्णालयाचे कारभारी बनून राहले. नुसते थांबलेच नाहीत तर राजकारण सुरू केले. डॉक्टरांचे हे राजकारण रूग्णांसाठी धोकादायक ठरू पाहत होते. या राजकारणापायी रूग्णांचे हाल होत आहेत. यातच शुक्रवारी दुपारी डॉ. यशवंत राजेभोसले यांच्यावरील हल्ल्यात ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांचाच हात असल्याचे राजेभोसले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अनेक वर्षे माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदावर राहिल्यानंतर बदली होऊनही राजकीय वरदहस्ताने केज येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे माजलगाव ग्रामीण रूग्णालयाचा पदभार देण्यात आला. दोन दिवसांच्या प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ.साबळे यांनी दोन वर्षानंतरही पदभार सोडलेला नाही. डॉ.राजेभोसले यांच्या मारहाण प्रकरणात त्यांचे नाव आल्याने शनिवारी जवळपास सर्वच रूग्णालय बंद ठेऊन निषेध नोंदविण्यात आला. याचा फटका सर्वसाामन्य रूग्णांना सहन करावा लागला.
डॉ.सुरेश साबळे यांची अनेक वेळा बदली झाली. परंतु त्यांनी वरिष्ठांवर राजकीय दबाव आणून बदली रद्द करून घेतली. तीन वर्षापूर्वी केज येथे बदली झाली होती. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती होती. परंतु त्यांनी दोन वर्षापूर्वी राजकीय दबावापोटी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्रतिनियुक्ती करून माजलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार घेतला होता. दोन दिवसासाठी प्रतिनियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना असतांना देखील डॉ. साबळे हे मागील दोन वर्षापासून माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हाकत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने सर्व रुग्णालयांच्या तपासण्या करून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान डॉ.सुरेश साबळे यांनी डॉक्टरांना त्रास देत त्यांना ‘टार्गेट’ केल्याचा आरोप जाहीरपणे केला होता. एप्रिल महिन्यात शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या डॉक्टरांची बैठक झाली होती. यामध्ये डॉ.साबळे यांनी बीएचएमएस असलेल्या डॉक्टरांकडे जाऊ नये, असे नियम काढल्याने डॉ. यशवंत राजेभोसले व काही डॉक्टरांनी याला विरोध केला होता. आपल्याला डॉक्टरांनी विरोध केल्याचा राग मनात धरूनच डॉ.साबळे यांनी गुंडाकडून माझ्यावर हल्ला केला असल्याचा आरोप डॉ. राजेभोसले यांनी केला.