माजलगावात मोर्चे

By Admin | Updated: August 13, 2014 00:57 IST2014-08-13T00:29:32+5:302014-08-13T00:57:10+5:30

माजलगाव: येथील आठवडी बाजारात महाविद्यालयाशेजारची जमीन देऊन तेथे बाजार भरवावा, या मागणीसाठी शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी

Majalgaon front | माजलगावात मोर्चे

माजलगावात मोर्चे




माजलगाव: येथील आठवडी बाजारात महाविद्यालयाशेजारची जमीन देऊन तेथे बाजार भरवावा, या मागणीसाठी शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी तर राज्यघटनेतील मूलतत्वानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत समाजबांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मंगळवारचा दिवस मोर्चाने दणाणून गेला होता.
आठवडी बाजारासाठी लढा
नगर परिषद मनूर रोडवरील सर्व्हे नं. ८ मध्ये बाजार भरविण्यासाठी अडून बसली असून, त्यासाठी विरोध होत आहे. प्रशासनाने याठिकाणी बाजार भरविल्यास बुधवारच्या बाजारावर बहिष्कार टाकून सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे भाई थावरे यांनी दिला आहे.
सध्या येथील आठवडी बाजाराच्या स्थलांतराचा पश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. गजानन मंदिर रोडवरील बाजार हटविण्यासाठी जगदीश साखरे व इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेत बाजाराचे स्थलांतर करण्यासाठी एक वर्षापूर्वीच न्यायालयाने नगर परिषद प्रशासनाला सक्तीचे आदेश दिले होते. ७ आॅगस्ट रोजी साखरे व वांडेकर यांनी आत्मदहनचा प्रयत्नही केला होता. तरीसुद्धा बाजारतळाचा पश्न मिटला नाही. न्यायालयाच्या तंबीमुळे नगर परिषद त्यांच्या जागेत सर्व्हे नं. ८ मनूर रोडवर बाजार नेण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता माजलगाव महाविद्यालयाशेजारी सर्व्हे नं. ३०८ मध्ये गायरान जमिनीवर बाजार भरविण्याची शेतकरी, व्यापारी, नागरिकांची मागणी आहे. न.प.ने साफसफाई केली होती. मात्र याठिकाणी बाजार भरविण्यास महाविद्यालय विरोध करीत आहे. महाविद्यालयाशेजारील जागेतच बाजार स्थलांतरीत करावा व ही जागा बाजारासाठी कायमस्वरुपी देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, शेतकरी, नागरिक यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये मनसेचे डॉ. भगवान सरवदे, बाळासाहेब मस्के, श्रीराम जाधव, संजय होके, राधाकृष्ण नायबळ, सलीम आतार यांच्यासह शेतकरी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आरक्षणासाठी बंजारा समाजाचा पारंपरिक वेशभूषेत मोर्चा
राज्यघटनेतील मूलतत्वानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील बंजारा समाजातील शेकडो महिला, पुरुषांनी एकत्रित येऊन आरक्षणासाठी मोर्चा काढला. दिवसेंदिवस निवडणुका जवळ येत आहेत. निवडणुकांचा अंदाज घेता समाजबांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. निवडणुकीपूर्वी बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. संपत चव्हाण, जीवन राठोड, शरद चव्हाण, उदयभान राठोड, मनोज आडे, शाम पवार यांच्यासह महिला, पुरुष, तरुण मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चानंतर तहसीलदार अरुण जराड यांना समाजबांधवांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकूणच मंगळवारचा दिवस मोर्चाने गाजला. मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. (वार्ताहर)

Web Title: Majalgaon front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.