मुख्य रस्त्यावर होतेय कायम वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: May 10, 2014 23:54 IST2014-05-10T23:16:57+5:302014-05-10T23:54:01+5:30
रमेश शिंदे , औसा औसा शहर हे तालुक्याचे ठिकाण आणि परिसरातील गावासाठी मुख्य बाजारपेठ आहे.

मुख्य रस्त्यावर होतेय कायम वाहतुकीची कोंडी
रमेश शिंदे , औसा औसा शहर हे तालुक्याचे ठिकाण आणि परिसरातील गावासाठी मुख्य बाजारपेठ आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक शासकीय निमशासकीय कामे तसेच बाजारहाट करण्यासाठी शहरात येतात. शहरात अॅप्रोच रोड चौक ते बसस्थानक व किल्ला मैदान ते हनुमान मंदिर हे दोन मुख्य रस्ते आहेत. पण या दोन्ही रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडत असल्याने रस्त्यावरून चालणे ही मुश्कील होते. बसस्थानकासमोर प्रवासी आॅटो व फळगाडेवाल्यांची कायमची कोंडी झालेली असते. परिणामी, पादचार्यांना त्रास सहन करावा लागतो. औसा शहरातील किल्ला मैदान ते हनुमान मंदिर रस्ता रुंदीकरणाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. जामा मशीद ते गांधी चौक हा पहिला टप्पा तर गांधी चौक ते मोरे गल्ली कॉर्नर या दुसर्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन रस्ता रुंद झाला असला तरी बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानासमोर वाहने पार्किंग केली जातात. पार्किंगमुळे रुंद झालेला रस्ता ही अरुंद होत आहे. जामा मशीद ते हनुमान मंदिर या रस्ता रुंदीकरणाचा तिसरा टप्पा अद्याप झालेला नाही. याच रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीला कंटाळलेले व्यापारी आणि नागरिक रस्ता रुंदीकरणाचा हा तिसरा टप्पा लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. बसस्थानक ते अॅप्रोच रोड हा ही शहराच्या दृष्टीने मुख्य रस्ता या रस्त्यावर बसस्थानक व्यापारी संकुल विविध शासकीय कार्यालये, ग्रामीण रुग्णालय, बँकांचा शाखा आहेत. अॅप्रोच रोड ते हनुमान मंदिर या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. पण हे कामही रखडत-रखडत सुरू आहे. रुंदीकरण झालेल्या या रस्त्यावरच वाहने उभी राहतात. अॅप्रोच रोड ते बसस्थानक या रस्त्यावर अॅटोची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अॅप्रोच रोड चौकात ते अॅटो चालकाचेच साम्राज्य आहे. त्यामुळे अन्य वाहनधारकांना अॅटोचालकांचा त्रास सहन करावा लागतो. पण याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. बसस्थानकासमोर तर फळगाडे व आॅटो अशी दुहेरी कोंडी आहे. पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे़ वाहतूक सुरळीत करू औसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम़एम़ कोडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की अॅप्रोच रोड ते हनुमान मंदिर या रस्त्याच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे़ काही ठिकाणी नालीचे काम राहिले आहे़ नाली झाल्यानंतर अतिक्रमणे अपोआपच निघणार आहेत़ अवकाळी पावसामुळे या कामाची गती मंदावली आहे़ आता पाऊस उघडल्याने लवकर हे काम पूर्ण करू, असे उपअभियंता कोडगे यांनी सांगितले़ औश्याचे पोलिस निरीक्षक सुनील ओव्हळ यांच्याशी संपर्क साधला असता बेशिस्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी पथक नेमणार असल्याचे सांगितले़