माहुरगडाचे रुपडे पालटणार
By Admin | Updated: July 17, 2014 00:22 IST2014-07-17T00:12:08+5:302014-07-17T00:22:19+5:30
श्रीक्षेत्र माहूर : मंदीर समितीने मंदिर परिसराच्या भोवती संरक्षित भिंत (परकोट) बांधण्याचे काम हाती घेतले आहे़
माहुरगडाचे रुपडे पालटणार
श्रीक्षेत्र माहूर : मंदीर समितीने मंदिर परिसराच्या भोवती संरक्षित भिंत (परकोट) बांधण्याचे काम हाती घेतले आहे़ सोबतच श्री रेणुका मातेच्या नित्यकर्माशी संबंधित असलेल्या व रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पवित्र उंबरझरा कुंडाच्या पुनरुज्जीवनाचे कामही हाती घेण्यात आले आहे़
श्री रेणुकामाता मंदिरावर नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीस सुधारणा करण्याचे अधिकार असल्याने समितीने भाविकांच्या सुविधा, सुरक्षा वाढविण्यावर भर दिला़ सर्वप्रथम श्री रेणुका मातेचे आॅनलाईन दर्शन जगभरातील भाविकांना व्हावे व देणग्याही आॅनलाईन देता याव्यात यासाठी मातेच्या नावाची वेबसाईट सुरू केली़ मंदिर प्रशासनाकडून श्री रेणुका मातेच्या नित्या कर्माशी संबंधित प्रत्येक ठिकाणाचा यथोचित विकास व्हावा व भाविकांना दर्शन सुलभ होवून मन प्रसन्न व्हावे या हेतुने प्रशासनाने योजना आखली असून त्याचाच एक भाग म्हणून उंबरझरा कुंडाच्या पुनरूज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले असून पायी जाणाऱ्या दिंड्यातील भाविकांनाही या कुंडातील पाण्याचा लाभ घेता येणार आहे़
मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी आंबा, चिंच, कडुनिंग, अशोका व इतर प्रकारची १०४० झाडे खरेदी करण्यात आली असून लवकरच परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे़
भाविकांना आरोग्याबाबत कुठलीही समस्या उद्भवल्यास त्यांना तत्काळ, लगेच गढावरच सुविधा मिळाव्या या हेतुने संस्थानवर मिनी रुग्णालय उभारण्यात आले असून येथे तज्ज्ञ डॉक्टर्स परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ अतिदक्षता विभागाचे उपचार मिळावे, यासाठी सुसज्ज अशी अॅम्बुलन्स खरेदी करण्यात आली असून ती भाविकांच्या सुविधेत २४ तास गढावर सज्ज राहणार आहे़ आणखी सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ (वार्ताहर)
संरक्षक भिंत, परकोट भिंती बांधकाम
समितीकडून शेगाव-शिर्डी देवस्थानाच्या धर्तीवर भाविकांसाठी अनेक सुविधा प्रस्तावित असून थोड्याच दिवसात श्री रेणुकामाता संस्थानकडून भाविक भक्तांना सुविधा वाढाव्या या हेतुने अतिसुसज्ज अशी भक्त निवासाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे कार्यालय अधीक्षक पी़डी़ चव्हाण यांनी दिली़