कुख्यात दरोडेखोर महेश्या ऊर्फ महेश काळे अटकेत

By Admin | Updated: August 7, 2014 02:06 IST2014-08-07T01:02:24+5:302014-08-07T02:06:11+5:30

औरंगाबाद : कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या महेश्या ऊर्फ महेश सीताराम काळे (शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना बुधवारी यश मिळाले.

Maheshya alias Mahesh Kale, the notorious robber | कुख्यात दरोडेखोर महेश्या ऊर्फ महेश काळे अटकेत

कुख्यात दरोडेखोर महेश्या ऊर्फ महेश काळे अटकेत

औरंगाबाद : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरोडे टाकून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या महेश्या ऊर्फ महेश सीताराम काळे (३५,रा. टेंभापुरी) याला अटक करण्यात औरंगाबाद शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना बुधवारी यश मिळाले. या कारवाईत बिडकीन पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ.कांचन चाटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
याविषयी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी सांगितले की, महेश्या हा कुख्यात दरोडेखोर दहा ते बारा वर्षांपूर्वी सक्रिय होता. त्यावेळी त्याने महाराष्ट्र आणि अन्य शेजारील राज्यांतील दरोडेखोरांना सोबत घेऊन दरोडे आणि लुटमारीचे गुन्हे केले. मात्र, दहा वर्षांपासून तो स्वत: गुन्ह्यात सहभागी न होता परप्रांतीय दरोडेखोरांना बोलावून घेऊन दरोडे टाकत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. २६ जून रोजी पहाटे वाळूजमधील ओयासिस चौकातील आयकॉन इमारतीमध्ये असलेले मणीपूरम गोल्ड फायनान्स, गुरुकृपा फरसाण मार्ट या दुकानांवर त्याने साथीदारांसह दरोडा टाकला होता. या दरोड्यात त्यांना मणीपूरम गोल्ड संस्थेची तिजोरी फोडण्यात अपयश आले होते. त्यामुळे मोठी रक्कम आणि सोन्याचे दागिने सुरक्षित राहिले होते. या गुन्ह्यात आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.तेव्हापासून आरोपी महेश्या मध्य प्रदेशात फरार झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या मागावर असताना तो टेंभापुरी येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळविली. तो मंगळवारी येणार असल्याचे खबऱ्याने सांगितल्याने पोलिसांनी काल दिवसभर त्याच्या मार्गावर सापळा रचला होता. मात्र, तो काल आलाच नाही. दरम्यान, आज पहाटे ७ वाजेपासून पोलिसांनी पुन्हा टेंभापुरी शिवार गाठले. त्यावेळी तो चेहरा लपवून जात असल्याचे पोलिसांना दिसले.
साध्या वेशातील पोलिसांच्या नजरेस तो पडला आणि उपनिरीक्षक खंडागळे, सहायक उपनिरीक्षक गौतम गंगावणे, हवालदार अशोक नरवडे, कैसर पटेल, नवनाथ परदेशी, भावसिंग चव्हाण, प्रकाश गायकवाड, गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, महेश कोमटवार यांनी त्यास पकडले. त्यास अटक करून गुन्हे शाखेत आणले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Maheshya alias Mahesh Kale, the notorious robber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.