महायुतीला २ वर्षांत विजयाच्या हॅट्रिकची संधी; लोकसभा व विधानसभेचा फड महायुतीने गाजविला अन् जिंकलाही 

By शांतीलाल गायकवाड | Updated: December 18, 2025 10:07 IST2025-12-18T10:07:18+5:302025-12-18T10:07:53+5:30

शिवसेनेला आपला खुंटा हलवून पक्का करण्याची संधी; काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र लढल्यास चित्र वेगळे

Mahayuti gets a chance for a hat-trick of victories in 2 years; Mahayuti wins both Lok Sabha and Vidhan Sabha elections and even wins | महायुतीला २ वर्षांत विजयाच्या हॅट्रिकची संधी; लोकसभा व विधानसभेचा फड महायुतीने गाजविला अन् जिंकलाही 

महायुतीला २ वर्षांत विजयाच्या हॅट्रिकची संधी; लोकसभा व विधानसभेचा फड महायुतीने गाजविला अन् जिंकलाही 

शांतीलाल गायकवाड 
लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेपाठोपाठ विधानसभेचे मैदान मारलेल्या महायुतीला महानगरपालिकेचा फड जिंकून विजयाची हॅटट्रिक मारण्याची सुवर्णसंधी आहे. मुळात हे शहर अखंडित शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच नावलौकिकाला गेलेला होता. शिवसेनेतून फुटून निघालेल्या शिंदेसेनेने लोकसभा व विधानसभेत भरभक्कम विजय नोंदवून हा लौकिक राखला आहे.

शहरात सध्या शिंदेसेनेचे दोन व भाजपाचेही दोन आमदार आहेत. त्यातही शिंदेसेना व भाजपाने एकएक कॅबिनेट मंत्रिपदही शहराला दिले आहे. शिवाय दोन खासदारही दिमतीला आहेत. त्यातही महायुती एकत्रित लढण्याची शक्यताच अधिक दिसते. त्यामुळे महायुतीचे पारडे जड दिसते. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील अनेक शिलेदार अगोदरच महायुतीच्या कोणत्या ना कोणत्या पक्षात डेरे दाखल आहेत. महाआघाडी होईल की नाही? वंचित बहुजन आघाडीसोबत असेल का? आदी अनेक मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत.

एकूण प्रभाग किती आहेत? - २९
एकूण सदस्य संख्या किती? - ११५

पाच वर्षांचे प्रशासक राज आता संपणार

एप्रिल २०२० मध्ये सभागृहाची मुदत संपली व सभागृह विसर्जित करण्यात आले. तेव्हापासून या महापालिकेवर प्रशासक राज आहे. अस्तिककुमार पांडे हे पहिले प्रशासक होते. त्यानंतर डॉ. अभिजित चौधरी आले. सध्या जी. श्रीकांत ही भूमिका निभावत आहेत.

हे मुद्दे निर्णायक ठरतील?

१. मतदार यादीतील घोळ हा निवडणुकीचा सर्वात मोठा वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. गेल्या महिन्यात ७,००० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. याबाबत जनतेतूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
२. शहरातील अनियमित व अपुरा पाणीपुरवठा हा कायमचा ज्वलंत मुद्दा असून, प्रशासक राजवटीतही तो सुटला नाही. नागरिकांना आठ दिवसांआड तास-दीड तासच पाणी मिळते आहे.
३. निवडणूक आधी काही महिने दहा प्रमुख रस्त्यांवर पाडापाडी केली असली तरी धूळ, सांडपाणी, खड्डे आणि कचरा कोंडीच्या समस्या कायम आहेत.
४. पाच वर्षे प्रशासकांनी कर वसुली वाढवली, कोविड हाताळणी चांगली केली व स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती दिली. मात्र, भ्रष्टाचाराच्या तक्रारी, नेत्यांशी संघर्षामुळे टीका होत आहे.

२०१५ मध्ये महापालिका निवडणुकीतील मतदार

एकूण मतदार - ६, ८९,३९२
पुरुष मतदार - ३,६६,३८२
महिला मतदार - ३,२३,०१०
इतर - ००० 

२०१५ मध्ये झालेले मतदान

पुरुषांनी - २,१८,१८२
आणि महिलांनी - १,८३,१३६
एकूण मतदान - ४,०१,३१८
५८.२१ टक्के मतदान झाले होते.

आता एकूण किती मतदार ?

एकूण - ११,१८,२८३
पुरुष - ५,७४,९३०
महिला - ५,४३,२६८
इतर - ८५

पक्षीय जागावाटप आणि स्पर्धाः ११३ जागांपैकी ५८ महिलांसाठी, ३१ ओबीसी, २२ एससी आणि २ एसटीसाठी आरक्षित आहेत. त्यावरून जागावाटप वाद वाढेल. गेल्या निवडणुकीत शिवसेना (२९), एआयएमआयएम (२५), भाजप (२२) आघाडीवर; आता महायुतीत फूट आणि १,४४० उमेदवार अर्ज दाखल. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची स्पर्धा तीव्र असेल.

वाढलेले मतदार ठरणार निर्णायक 

महापालिका १० वर्षांत हद्दीत ३ लाख ९८ हजार मतदार वाढले. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या मतदारांचा कौल महायुतीच्या पारड्यात गेल्याचे दिसते. महापालिकेच्या निवडणुकीतही हे वाढलेले मतदार निर्णायक ठरणार आहेत.

Web Title : महायुति की निगाहें औरंगाबाद स्थानीय चुनावों में हैट्रिक जीत पर।

Web Summary : लोकसभा और विधानसभा चुनावों में जीत के बाद, महायुति का लक्ष्य औरंगाबाद नगर निगम चुनावों में हैट्रिक बनाना है। मतदाता मतदान में वृद्धि गठबंधन के पक्ष में है। पानी की आपूर्ति और मतदाता सूची विसंगतियां जैसे प्रमुख मुद्दे हैं। चुनाव में महायुति और महा विकास अघाड़ी के बीच कड़ी टक्कर होगी।

Web Title : Grand Alliance eyes hat-trick win in local Aurangabad elections.

Web Summary : After Lok Sabha and Assembly victories, the Grand Alliance aims for a hat-trick in the Aurangabad Municipal Corporation elections. Increased voter turnout favors the alliance. Key issues include water supply and voter list discrepancies. The election will see a tough fight between the Grand Alliance and Maha Vikas Aghadi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.