महायुती आमने-सामने
By Admin | Updated: September 12, 2014 00:25 IST2014-09-12T00:23:24+5:302014-09-12T00:25:51+5:30
उस्मानाबाद : सेना-भाजपाने इतर चार पक्षांना सोबत घेऊन एकत्रित मुठ बांधल्यानंतर युतीची महायुती झाली. मागील काही दिवसांत राज्य पातळीवर या सहाही पक्षांमध्ये तिकिटासाठी कमालीची रस्सीखेच सुरू आहे

महायुती आमने-सामने
उस्मानाबाद : सेना-भाजपाने इतर चार पक्षांना सोबत घेऊन एकत्रित मुठ बांधल्यानंतर युतीची महायुती झाली. मागील काही दिवसांत राज्य पातळीवर या सहाही पक्षांमध्ये तिकिटासाठी कमालीची रस्सीखेच सुरू आहे. याचे लोण आता जिल्हा पातळीवर पोहोंचल्याचे दिसून येते. शिवसेनेने गुरूवारी पक्षनेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या ताब्यातील तुळजापूर मतदार संघावर दावा ठोकला. तर तुळजापुरात झालेल्या भाजपाच्या बैठकीत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षाने शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या परंडा मतदारसंघावर दावा ठोकल्याने महायुतीतील पक्ष आमने-सामने आल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, परंडा मतदारसंघ मिळविण्यासाठी महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षही जोर लावत आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शहरातील हातलाई मंगल कार्यालयात शिवसैनिकांचा गुरूवारी निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात खैरे यांनी जिल्ह्यातील चारही मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. बैठकीला संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर, सिने अभिनेते अमोल कोल्हे, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, खा. रवींद्र गायकवाड, आ. ओम राजेनिंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, दयानंद गायकवाड, शंकरराव बोरकर, भारत इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने लढवावा, अशी शिवसैनिकांची आग्रही मागणी आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोंचविली असून, ठाकरेसुध्दा याबाबत अनुकूल असल्याचे खैरे यांनी या बैठकीत सांगितले. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. तुळजापुरात शिवसेना मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ शकते. त्यामुळेच हा मतदारसंघ आम्ही शिवसेनेसाठी मागत असल्याचे सांगत उमेदवार कोण हे न पाहता शिवसैनिकांनी धनुष्यबाण हाच आपला उमेदवार असल्याचे समजून काम करावे, असे आवाहन केले.
शिवसेनेचा उस्मानाबादेत अशा पध्दतीचा निर्धार सुरू असतानाच तिकडे तुळजापूरमध्ये भाजपाने बुथप्रमुखांची बैठक घेतली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, अविनाश कोळी, अशोक जगदाळे, अॅड. अनिल काळे, तालुकाध्यक्ष विजय शिंगाडे, संजय निंबाळकर, रामभाऊ पडवळ, रामदास कोळगे, भीमराव साळुंके आदी उपस्थित होते. भाजपाची ताकद वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निम्या जागा भाजपाला मिळायला हव्यात, असे सांगत तुळजापूर विधानसभा मतदारसंघाबरोबर भूम-परंडा मतदारसंघही भाजपाने लढवावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे व याबाबत पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. बैठकीला ३७० बुथ प्रमुखांसह दीडशे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
शिवसेना-भाजपाने गुरूवारी एकमेकाच्या जागांवर दावा ठोकल्याने महायुतीत सर्व काही अलबेल नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भूम-परंडा ही जागा सेनेकडे असून, महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला मिळावी, अशी आग्रही मागणी महादेव जानकर यांनी यापूर्वीच केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपानेही आता शिवसेनेच्या या जागेवर दावा ठोकल्याने महायुतीतील पुढील घडामोडींकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी निर्धार मेळाव्यात झालेल्या भाषणात जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांच्या कामाचे जाहीर कौतूक केले. अवघ्या तीन महिन्यांत अडीच लाख सदस्य नोंदणी करणारा उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा असल्याचे सांगून, गाव तेथे शाखा उपक्रम राबविणाऱ्या जिल्हा प्रमुख पाटील यांचे काम कौतुकास्पद असल्याचे खैरे म्हणाले. त्याच वेळी संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी मात्र आमदार ओम राजेंना कानपिचक्या दिल्या. लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद-कळंब वगळता इतर सर्वच विधानसभा मतदारसंघातून प्रा. गायकवाड यांना भरघोस मताधिक्य मिळाले. मात्र, मोदी लाट असतानाही उस्मानाबादमधून केवळ वीस हजारांचे मताधिक्य मिळाल्याचे सांगत हा उस्मानाबादसाठी धोक्याचा इशारा असल्याचे ते म्हणाले. ‘प्रत्येक निवडणूक भाषणावरच जिंकता येत नाही. त्यामुळे गाफिल राहू नका’, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या.