महावितरण अ, बडवे आॅटो उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:16 IST2019-04-27T01:15:50+5:302019-04-27T01:16:39+5:30
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने शहर पोलीसवर ३४ आणि बडवे आॅटोने एमआयटी हॉस्पिटल संघावर ८६ धावांनी मात करीत उपांत्य फेरी गाठली. राहुल शर्मा आणि संदीप म्हस्के हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

महावितरण अ, बडवे आॅटो उपांत्य फेरीत
औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत महावितरण अ संघाने शहर पोलीसवर ३४ आणि बडवे आॅटोने एमआयटी हॉस्पिटल संघावर ८६ धावांनी मात करीत उपांत्य फेरी गाठली. राहुल शर्मा आणि संदीप म्हस्के हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत शैलीदार फलंदाज राहुल शर्माने केलेल्या वादळी फलंदाजीच्या बळावर महावितरण अ संघाने बलाढ्य शहर पोलीस संघाविरुद्ध २० षटकांत ४ बाद २०४ धावांचा एव्हरेस्ट रचला. राहुल शर्मा याने अवघ्या २४ चेंडूंतच ५ टोलेजंग षटकार आणि ६ खणखणीत चौकारांसह ६७ धावांचा पाऊस पाडला. स्वप्नील चव्हाणने ४ चौकारांसह ४१, शाहेद सिद्दीकीने १२ चेंडूंत २६ धावांचे योगदान दिले. शहर पोलीसकडून कर्णधार गिरिजानंद भक्त, राजू परचाके, राहुल जोनवाल व योगेश चौधरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीस संघ २० षटकांत ८ बाद १७० पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून अनिल आहेवाडने २ षटकार व ६ चौकारांसह ४७, योगेश चौधरीने ३ चौकार व एका षटकारासह २९, अरविंद शेजूळने २८ व आसीफ शेखने २२ धावा केल्या. महावितरण अ संघाकडून स्वप्नील चव्हाण आणि पवन सूर्यवंशी यांनी प्रत्येकी २, तर सय्यद इनायत अली, कैलास शेळके व राहुल शर्मा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत बडवे आॅटोने २० षटकांत ७ बाद १८२ धावा केल्या त्यांच्याकडून संदीप म्हस्केने ३३ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ५२, हरमितसिंग रागीने २८, सतीश भुजंगे व भास्कर जिवरग यांनी प्रत्येकी २१ व विजय ढेकळेने नाबाद २० धावा केल्या. एमआयटी हॉस्पिटलकडून साई डहाळेने ३, अमोल इंगळे याने २ व रोहन शहा याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमआयटी हॉस्पिटल ९ बाद ९६ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून लखन सूर्यवंशीने १९, रोहन शहाने १६ व साई डहाळेने १५ धावा केल्या. बडवे आॅटोकडून भास्कर जिवरगने ३, सतीश भुजंगे व हरमितसिंग रागी यांनी प्रत्येकी २, तर ज्ञानेश्वर भुरंगे व जावेद चाँद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. शनिवारी सकाळी ७.३0 वाजता कम्बाइंड बँकर्स व बडवे आॅटो व दुपारी १.३0 वा. एमजीएम अ वि. जिल्हा परिषद यांच्यात लढत होणार आहे.