निखिल नाईकच्या स्फोटक फलंदाजीने महाराष्ट्राचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:16 IST2018-01-08T00:16:18+5:302018-01-08T00:16:29+5:30
यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईक याने प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या चौफेर टोलेबाजीच्या बळावर महाराष्ट्राने आज येथे पश्चिम विभागीय सय्यद मुश्ताक अली टी २0 लीगच्या सामन्यात गुजरात संघावर तीन चेंडू आणि चार विकेट राखून विजय मिळवला.

निखिल नाईकच्या स्फोटक फलंदाजीने महाराष्ट्राचा विजय
राजकोट : यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईक याने प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या चौफेर टोलेबाजीच्या बळावर महाराष्ट्राने आज येथे पश्चिम विभागीय सय्यद मुश्ताक अली टी २0 लीगच्या सामन्यात गुजरात संघावर तीन चेंडू आणि चार विकेट राखून विजय मिळवला.
एससीए स्टेडियमवर झालेल्या या लढतीत गुजरात संघाने ८ बाद १५१ धावा केल्या. हे लक्ष्य महाराष्ट्राने १९.३ षटकांत ६ गडी गमावून १५४ धावा करीत गाठले. गुजरातकडून कर्णधार अक्षर पटेलने ३८ धावा केल्या आणि चिराग गांधी याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी केली. चिराग गांधीने ३७ चेंडूंत एक षटकार, ६ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. हे दोघे खेळपट्टीवर येण्याआधी गुजरातचा अर्धा संघ ४५ धावांत तंबूत परतला होता. महाराष्ट्राकडून डोमेनिक मुथ्थुस्वामीने २७ धावांत ४ गडी बाद केले. श्रीकांत मुंडे, नौशाद शेख आणि समद फल्लाह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात महाराष्ट्राचीही स्थिती बिकट झाली होती आणि त्यांनी ७.५ षटकांतच आघाडीचे ऋतुराज गायकवाड (२६), कर्णधार राहुल त्रिपाठी (७), अंकित बावणे (१), नौशाद शेख (४) यांना गमावले होते; परंतु निखिल नाईक याने तडाखेबंद फलंदाजी करताना प्रयाग भाटी याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ४९ आणि दिव्यांग हिंगणेकर याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्याने अष्टपैलू श्रीकांत मुंडेच्या साथीने महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. निखिल नाईकने ३७ चेंडूंतच ६ चौकार आणि २ टोलेजंग षटकारांसह ७0 धावांची वादळी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने २६, प्रयाग भाटीने २३ व हिंगणेकर याने १५ धावा केल्या. गुजरातकडून अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावला याने २७ धावांत ३ गडी बाद केले. या विजयाने महाराष्ट्राला ४ गुण मिळाले आहेत.
संक्षिप्त धावफलक
गुजरात : २0 षटकांत ८ बाद १५१. (चिराग गांधी ६१, अक्षर पटेल ३८. डोमेनिक मुथ्थुस्वामी ४/२७, श्रीकांत मुडे १/३६, समद फल्लाह १/३२).
महाराष्ट्र : १९.३ षटकांत ६ बाद १५४. (निखिल नाईक नाबाद ७0)