Maharashtra Election 2019 : मंदावलेल्या बाजारपेठेत रंगताहेत राजकीय गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:09 PM2019-10-11T18:09:27+5:302019-10-11T18:11:47+5:30

काही व्यापारीही प्रचारात सक्रिय

Maharashtra Election 2019 : Political chats ringing in slow markets | Maharashtra Election 2019 : मंदावलेल्या बाजारपेठेत रंगताहेत राजकीय गप्पा

Maharashtra Election 2019 : मंदावलेल्या बाजारपेठेत रंगताहेत राजकीय गप्पा

googlenewsNext
ठळक मुद्देकाहींची आकडेमोड सुरू

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, तसेच दिवाळीही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, अजून ग्राहकी सुरू झाली नाही. यामुळे फावल्या वेळेत बाजारपेठेत राजकीय गप्पा रंगू लागल्या आहेत. दोन-चार व्यापारी एकत्र येऊन मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघातील आकडेमोड करून आपले भाकीत व्यक्त करीत आहेत. काही व्यापारी तर प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून आले. 

अनेक व्यापाऱ्यांनी दिवाळीचे सामान दुकानात भरून ठेवले आहे, तर अनेकांचा कंपनीत नोंदविलेल्या आॅर्डरनुसार माल त्यांच्या दुकानात येत आहे. जाधववाडीत तर नवीन बाजरीची आवक सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्री करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मोंढा, कापड बाजार, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात अजून दिवाळीची ग्राहकी सुरू झाली नाही. बुधवारी सदर प्रतिनिधीने बाजारपेठेत फेरफटका मारला असता, मोंढ्यात एका दुकानात चार-पाच व्यापारी जमून राजकारणावर गप्पा मारताना दिसले. नंतर ही संख्या दहाच्या वर गेली. मध्य, पूर्व व पश्चिम मतदारसंघात कोण निवडून येणार याचे दावे-प्रतिदावे केले जात होते. काहींनी तर पैजाही लावल्या. सिटीचौकातील कापड व्यापारीही दुपारी गप्पा मारताना दिसले. एका व्यापाऱ्याने तर आकडेमोड करून मागील निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला किती मते पडली होती व आता होणारी मतविभागणी, असे अभ्यासपूर्ण मत मांडून सर्वांना विचार करण्यास भाग पाडले. 

गुलमंडीवर रात्री ११ वाजेनंतर काही व्यापारी नियमित गप्पा मारताना दिसून येतात. दुकाने बंद झाल्यावर ते व्यापारी एकत्र येऊन गप्पा मारतात. येथेही मध्य मतदारसंघात काय घडेल, याविषयी तर्कवितर्क लावले जात होते.मोंढा, गुलमंडी, कुंभारवाडा, खाराकुंवा परिसरातील काही व्यापारी राजकीय पक्षांच्या व्यापारी आघाडीत पदाधिकारी आहेत. त्यांनी आपल्या दुकानात भाऊ, मुलाला बसवून स्वत: आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात झोकून दिले आहे. सिडकोतील व्यापारी महासंघात सर्व पक्षांचे कार्यकर्ते आहेत. त्यापैकी काही व्यापारी राजकीय पक्षाचे स्थानिक वॉर्डातील पदाधिकारी आहेत. अनेक व्यापाऱ्यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यातील मोठा भाऊ राजकारणात व लहान भाऊ व्यवसाय सांभाळतो. आविष्कार चौक, बजरंग चौक, टीव्ही सेंटर चौकातील हॉटेलमध्येही व्यापारी व अन्य नागरिक चहा पीत दुपारच्या वेळेस राजकीय परिस्थितीवर गप्पा मारताना दिसले. 

भाजीपाला अडत बाजारातील व्यापारी दुपारनंतर प्रचारात
जाधववाडीतील अडत बाजाराला पहाटे ५ वाजता सुरुवात होते व दुपारी १२ वाजेपर्यंत व्यवहार संपतात. त्यानंतर हे व्यापारी घरी जाऊन झोप काढतात व काही व्यापारी सायंकाळी आपापल्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत सहभागी होत आहेत. काही जण पूर्व व मध्यमधील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात बसलेले दिसून आले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Political chats ringing in slow markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.