‘महाबीज’ परत घेणार बियाणे !
By Admin | Updated: July 30, 2015 00:44 IST2015-07-30T00:40:54+5:302015-07-30T00:44:24+5:30
उस्मानाबाद : खरीप हंगामात चांगला पाऊस होईल, या आशेवर बिजोत्पादनासाठी कर्ज व उसनवारी करून महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी केले.

‘महाबीज’ परत घेणार बियाणे !
उस्मानाबाद : खरीप हंगामात चांगला पाऊस होईल, या आशेवर बिजोत्पादनासाठी कर्ज व उसनवारी करून महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी केले. परंतु, पावसाने दडी मारल्याने या महागड्या बियाण्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरील बियाणे ‘महाबीज’ने परत घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही बियाणे महामंडळाकडे हा प्रश्न मांडला होता. त्यानुसार १ आॅगस्टपासून बियाणे घेऊन पैसे परत करण्यात येणार आहेत.
मागील दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदाही विक्रमी पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी बिजोत्पादनासाठी सोयाबीन बियाणे खरेदी केले आहे. बाजारात मिळणाऱ्या अन्य कंपन्यांच्योे बियाण्याच्यो तुलनेत हे बियाणे महागडे आहे. या बियाण्याची पेरणी केल्यानंतर उत्पादित बियाण्याची विक्री महाबीजला केली जाते. त्यामुळे तुलनेत दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी महाबीजच्या येथील कार्यालयात बियाणांची खरेदी केली आहे. उत्पादन चांगले होईल आणि आर्थिक फायदाही होईल, असे आर्थिक गणित जुळविले होते. अनेक शेतकऱ्यांनी प्रसंगी कर्ज काढून बियाणे खरेदी केले. परंतु जुलै महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने सोयाबीन बियाणाचे करायचे तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दुबार पेरणीची शक्यताही दुसर झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे हे बियाणे महाबीजने घेवून शेतकऱ्यांना पैसे परत द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती.
त्याचप्रमाणे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही २९ जुलै रोजी महाबीजचे महाव्यवस्थापक उनाळे यांच्याशी चर्चा केली होती. शेतकऱ्यांकडील बियाणे परत न घेतल्यास त्याचा फटका बसेल. त्यामुळे हे बियाणे परत घ्यावे. इनस्पेक्शनची फीस परत करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यावर महाबीजने सकारात्मक भूमिका घेत १ आॅगस्टपासून शेतकऱ्यांचे बियाणे परत घेऊन त्यांना पैसे परत केले जातील, असे आश्वासन दिले आहे. तसे आदेश येथील कार्यालयास निर्गमित केले असल्याचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस रामचंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ज्यांना बियाणे परत करायचे असेल अशा शेतकऱ्यांनी महाबीजच्या कार्यालयात अर्ज देऊन त्याची पोच घ्यावी, असेही त्यात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)