महाधरणे आंदोलनास उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:04 IST2017-07-29T01:04:57+5:302017-07-29T01:04:57+5:30

औरंगाबाद : गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक निरपराध नागरिक ठार झाले आहेत. देशभरात होत असलेल्या या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्टÑ मुस्लिम अवामी कमिटी, औरंगाबादतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले होते

mahaadharanae-andaolanaasa-usalalaa-janasaagara | महाधरणे आंदोलनास उसळला जनसागर

महाधरणे आंदोलनास उसळला जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक निरपराध नागरिक ठार झाले आहेत. देशभरात होत असलेल्या या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्टÑ मुस्लिम अवामी कमिटी, औरंगाबादतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. या धरणे आंदोलनास जनसागर उसळला होता. स्वामी अग्निवेश आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले शायर इम्रान प्रतापगढी यांनी देशातील अराजक स्थितीवर मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.
महाधरणे आंदोलनासाठी मागील तीन महिन्यांपासून जोरदार तयारी करण्यात येत होती. जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक कॉर्नर मीटिंग कमिटीतर्फे घेण्यात आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी २ वाजता शहरातील विविध मशिदींमध्ये विशेष नमाज अदा केल्यानंतर भाविकांचा जनसागार दिल्लीगेटकडे हळूहळू येत होता. दुपारी ३ वाजता या भागात जिकडेतिकडे अलोट गर्दी दिसून येत होती. परिसरात कुठेच पाय ठेवायलाही जागा नव्हती. विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मनपाच्या ग्राऊंडमध्ये भव्य स्टेज लावण्यात आला होता. मैदानात जागा नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा बाजूने तब्बल चार तास नागरिक उभे होते. शहरासह ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रारंभी, वाजेद कादरी यांनी महाधरणे आयोजित करण्यामागील संकल्पना प्रास्ताविकात नमूद केली. महाधरणे आंदोलनास खास काश्मीरहून आलेले सलमान निझामी यांनी यावेळी नमूद केले की, मागील काही वर्षांपासून देशात अत्यंत घाणेरडे राजकारण सुरू आहे. या देशातील मुस्लिमांना टार्गेट करणे, देशद्रोही ठरविण्याचे काम करण्यात येत आहे. इतिहास उघडून बघावा, स्वातंत्र्याच्या लढाईत किती मुस्लिमांनी प्राणांची आहुती दिली. गोमातेच्या नावावर निव्वळ राजकारण, अर्थकारण कसे अवलंबून आहे, हे त्यांनी नमूद केले.
राष्टÑवादीचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी मुस्लिम आणि हिंदूंमध्ये कशी दरी उभारण्यात येते यावर अत्यंत मार्मिक विवेचन केले. लहानपणापासून शाळेत शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या वधाचे कथानक असे रंगवून सांगण्यात येते की, शाळेतील मुस्लिम मुलांच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचारच शिक्षक करीत नाहीत. शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते. त्यांच्या सैन्यात किती मुस्लिम होते याची जंत्रीच त्यांनी काढून सांगितली. सत्तेसाठी शिवाजी महाराजांनी कोणत्या राजांसोबत लढाया केल्या यावरही त्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
भाजपचा छुपा अजेंडा
या देशात दोन समाजांत तेढ निर्माण करून राज्य करण्याचे स्वप्न भाजप बघत असल्याचा आरोप प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी केला. बाबरी मशीद, वंदे मातरम्, गोवंश हत्या आदी मुद्दे काढून मुस्लिम आणि हिंदू अशी दरी निर्माण करण्यात येत आहे. त्यांचे हे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. देवाने मानवात भेदभाव केला नाही. सर्वांसाठी एकच सूर्य, एकसारखीच हवा, पाऊस मिळतोय, मग तुम्ही एवढी छोटी सत्ता सांभाळणारे भेदभाव कसे काय करू शकता, असा सवालही त्यांनी केला. प्रामाणिकपणे या देशाची सेवा करायची असेल तर अगोदर दारूबंदीसाठी कायदा करा. गोवंश हत्याबंदी कायदा करता येतो तर गोवंश विक्रीवरही बंदी आणावी, असेही त्यांनी नमूद करताच उपस्थित जनसागराने एकच टाळ्यांचा कडकडाट केला.
तत्पूर्वी लखनौ येथून आलेले तौखीर रजा खान यांनी उपस्थितांना सध्याच्या परिस्थितीची माहिती देत यातून मार्ग कसा काढावा हे नमूद केले. धर्मगुरूंनी नारिकांना जे माहित आहे, ते सांगण्यापेक्षा जे माहित नाही, ते सांगावे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अबुबकर रहेबर यांनी केले. आभार कमेटीचे अध्यक्ष इलियास किरमाणी यांनी केले. आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री फौजीया खान, कल्याण काळे, नामदेव पवार यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: mahaadharanae-andaolanaasa-usalalaa-janasaagara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.