‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू; विद्यार्थ्यांनो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा लवकर

By विजय सरवदे | Published: January 4, 2024 02:21 PM2024-01-04T14:21:03+5:302024-01-04T14:25:01+5:30

महिनाभराच्या खंडानंतर पोर्टल सुरू; २५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ

'Maha DBT' portal launched; Students apply for post matric scholarship early | ‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू; विद्यार्थ्यांनो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा लवकर

‘महाडीबीटी’ पोर्टल सुरू; विद्यार्थ्यांनो मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरा लवकर

छत्रपती संभाजीनगर : अखेर महिनाभराच्या खंडानंतर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे महाडीबीटी पोर्टल सुरू झाले असून समाज कल्याण विभागाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महाविद्यालये व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, महाडीबीटी पोर्टलशी लिंक असलेल्या यूआडी पोर्टलमध्ये बिघाड झाल्यामुळे आधार कार्ड पडताळणी होत नव्हती. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलची सेवा विस्कळीत झाली होती. आता एकमेकाशी लिंक असलेले हे दोन्ही पोर्टल सुरळीत झाल्यामुळे ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरणे सुकर झाले असल्याचे समाज कल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे नवीन आणि नूतनीकरण ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून हे पोर्टल सुरू झाले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीअगोदरच हे पोर्टल बंद पडले. त्यामुळे अकरावी, बारावी तसेच त्यापुढील पारंपरिक पदवी अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे व अन्य ठिकाणी धाव घेतली; पण पोर्टल उघडतच नव्हते. त्यामुळे अनेकांना मुदतीत अर्ज भरता आले नाहीत.

समाज कल्याण विभागाने या अनुषंगाने जिल्ह्यातील संबंधित सर्व महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत की, महाविद्यालयांच्या लॉगीनवर विद्यार्थ्यांनी सेंड केलेल्या शिष्यवृत्ती अर्ज आणि सोबतच्या कागदपत्रांची लवकरात लवकर पडताळणी करून परिपूर्ण अर्ज समाज कल्याण विभागाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करावेत.

विद्यार्थ्यांनी गती घेण्याची गरज
आतापर्यंत महाविद्यालयांच्या लॉगिनवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जापैकी अनु. जाती प्रवर्गाचे ९ हजार ४६४, ओबीसी प्रवर्गाचे ४ हजार ५००, विमुक्त जाती, भटक्या जमातीचे ७ हजार आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जवळपास ८० ते ९० अर्ज दिसत आहेत. दरम्यान, गतवर्षी जिल्ह्यातील ६७ हजार २५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले होते. या तुलनेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गती घेण्याची गरज आहे.

 

Web Title: 'Maha DBT' portal launched; Students apply for post matric scholarship early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.