‘मग्रारोहयो’चा उडाला बोजवारा
By Admin | Updated: July 2, 2014 00:31 IST2014-07-01T23:57:53+5:302014-07-02T00:31:02+5:30
गोकुळ भवरे , किनवट मागणीप्रमाणे काम व कामाचे दाम वेळेवर मिळत नसल्याने मग्रारोहयो योजनेचा किनवट तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे़

‘मग्रारोहयो’चा उडाला बोजवारा
गोकुळ भवरे , किनवट
मागणीप्रमाणे काम व कामाचे दाम वेळेवर मिळत नसल्याने मग्रारोहयो योजनेचा किनवट तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे़
ही योजना २ फेबु्रवारी २००६ रोजी राज्यात सुरू करण्यात आली़ सुरुवातीला या योजनेकडे मजुरांचा कल नव्हता़ तसेच ग्रामसेवकांनीही याकडे पाठ फिरविली होती़ परिणामी ही योजना अशी तशीच राबवल्या गेली़ मात्र २००९-१० नंतर कशीबशी ही योजना राबवण्यासाठी सुरुवात झाली़ मात्र, नोंदणी केलेल्या व जॉबकार्ड वितरीत केलेल्या मजुरांना म्हणावे तसे काम ग्रामपंचायतीने व यंत्रणेने उपलब्ध करून दिले नाही़ २०११-१२ या वर्षातील तर मजुरांचे देयके व हजेरीपट अडकूनच आहेत़ १ कोटी ९७ लाख रुपये ७७७ देयके व हजेरीपटापोटी अडकूनच असल्याने मग्रारोहयोच्या कामांना गतीच नाही़
तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नोंदणीकृत ८३ हजार ९९७ मजूर असून जॉबकार्डधारक कुटुंबे ३८ हजाराच्यावर असताना मागेल त्याला काम या कामाप्रमाणे दाम देण्यासाठी सुरू असलेल्या या योजनेच्या कामावर फार कमी मजुरांची उपस्थिती गेल्या चार वर्षात दिसून येते़ १३४ ग्रामपंचायती असताना सरासरी १०० ग्रामपंचायतीनेच मग्रारोहयोची कामे केली आहे़
कामाची मागणी केल्यानंतर मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना मागणी करूनही काम मिळालेले नाही़ काम केले तर वेळेवर दामही मिळाले नसल्याने या कामांकडे मजुरांची पाठच असल्याने नोंदणी केलेल्या मजुरांचा आकडा भलामोठा असला तरी प्रत्यक्षात कामावरील मजुरांचा गेल्या चार वर्षातील आकडा वाढलाच नसल्याने ही योजना उदासीनतेने राबविल्या गेल्याचे दिसून येते़ तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असताना केवळ दोनच वर्षात १०० ग्रामपंचायतीने मग्रारोहयोची कामे केली़ १०० टक्के ग्रामपंचायतीत ही योजना राबवल्या गेलीच नाही़ मोठ्या अपेक्षेने मजुरांसाठी सुरू केलेल्या या योजनेला तालुक्यात वावच मिळाला नसल्याचे वर्षनिहाय प्राप्त मजूर उपस्थिती व ग्रामपंचायतीने केलेल्या कामावरून दिसून येते़